
Nagpur News : विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्याने शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रस आता संपली आहे. त्यांनी आपला पक्ष अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करावा, महायुतीमध्ये सहभागी व्हावे, असे बोलले जात आहे.
भाजपचे नेते त्यांना संपवण्याचे प्रयत्न करीत आहे. मात्र एका पराभवाने कुठल्या पक्षाचा अस्त होत नाही. शरद पवार यांचे राजकारण कोणी संपवू शकत नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे.
भाजप हाच सर्वात मोठा दगाबाज पक्ष असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला. भाजपच्या शिर्डी येथील अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना दगाबाज म्हटले, दोन्ही पक्षाचे राजकारण संपले असेही आपल्या भाषणात सांगितले. याचा समाचार अनिल देशमुख यांनी घेतला.
देशमुख म्हणाले, भाजपने सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली. एवढ्याने त्यांचे समाधान झाले नाही. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसही फोडली. त्यांच्या बळावर महाविकास आघाडीचे सरकार पाडले. अडीच वर्षे सत्ता उपभोगली. त्यावरून दगाबाजीचे राजकरण कोण करीत आहे, हे सांगण्याची गरज नाही. एखाद्या निवडणुकीत पराभव झाला म्हणून शरद पवार आणि त्यांच्या पक्षाला कोणी संपवू शकत नाही.
शरद पवार यांनी 2019 मध्ये चमत्कार घडवला होता. भाजपला सत्तेत येण्यापासून रोखले होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीला मोठे यश मिळवून दिले. निवडणुकीत जय-पराजय सुरूच असतो. यावेळी भाजप महायुतीला मोठे यश मिळाले. मात्र या यशात त्यांचे फार काही कर्तृत्व नाही. ईव्हीएम आणि लाडकी बहीण योजनेमुळे फरक पडला, असा देशमुख यांनी सांगितले.
2014 मध्ये मोदी लाट असताना भाजपने 122 जागा जिंकल्या होत्या. यंदा कुठलीही लाट नव्हते. असे असताना 149 जागा लढवून भाजपने 132 जागा जिंकल्या. शेतकरी नाराज होते, प्रचंड महागाई वाढल्याने जनतेतही असंतोष होता. त्यामुळे ईव्हीएममध्ये गडबड करून भाजप जिंकली असाही आरोप यावेळी अनिल देशमुख यांनी केला.
सध्या महाविकास आघाडीबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. आघाडी तुटल्याचेही दावे केले जात आहे. दिल्लीच्या निवडणुकीत आम्ही वेगवेगळे लढत असल्याने तसा अर्थ काढला जात आहे. मात्र महाविकास आघाडी कायम आहे. आघाडीत आरोप-प्रत्यारोप होतच असतात. मोठ्या निवडणुकांमध्ये आम्ही आघाडीसोबत असतो, असे देशमुख म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची असते. शेकडो उमेदवार असतात. प्रत्येकाला लढायचे असते. आघाडीत मर्यादा येतात. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतमध्ये आघाडीतील घटक पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ आघाडी तुटली, फुटली असता होत नसल्याचे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.