नव्याने तयार झालेल्या महाविकास आघाडी आणि महायुतीमुळे नागपूर शहरातील विधानसभेच्या परंपरागत जागेतही बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेनेसुद्धा वारंवार पराभूत होण्यापेक्षा विजयाची शक्यता लक्षात घेऊन मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. काँग्रेसच्या होकार-नकारावर हे सारे अवलंबून असले, तरी दक्षिणच्या बदल्यात मध्य नागपूरवर आघाडीत तडजोड होण्याची अधिक आहे.
अलीकडेच विदर्भाचे संपर्क प्रमुख भास्कर जाधव ( Bhaskar Jadhav ) आणि शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मुंबईत बैठक झाली. विधानसभेच्या कुठल्या जागेवर लढायचे, तेथील राजकीय परिस्थिती, जातीय समीकरणे, पक्षाचे संघटन आदी विषयावर या बैठकीत चर्चा झाली. सुरुवातीला दक्षिण आणि पूर्व नागपूरवर शिवसेनेचा सर्वाधिक भर होता. मात्र, राजकीय परिस्थिती, मतदारांचा कौल, महाविकास आघाडीबाबत वातावरण लक्षात घेऊन सर्वाधिक भर मध्य नागपूरवर देण्यात येणार असल्याचे ठरवण्यात आले.
नागपूरचे संपर्क प्रमुख दुष्यंत चतुर्वेदी यांनीसुद्धा मध्य आणि दक्षिण या दोन मतदारसंघाची मागणी शिवसेनेकडे ( Shivsena ) केली असल्याचे समजते. भास्कर जाधव 18 ऑगस्टला नागपूरच्या दौऱ्यावर येणार आहे. या भेटीत सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.
हलबा, मुस्लिम बहुल मतदारसंघ म्हणून मध्य नागपूरची ओळख आहे. सुमारे 70 हजार मुस्लिम, 90 हजार हलबा आणि 25 हजार अनुसूचित जातींच्या मतदारांची संख्या येथे आहे. ही संख्या महाविकास आघाडीसाठी पोषक असल्याचं मानत जात आहे. उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) महाविकास आघाडीचा भाग झाल्यानंतर आता मुस्लिम आणि अनुसूचित जातीचा रोषही त्यांच्यावरचा मावळला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत हे प्रकर्षाने दिसून आले. ही बाबसुद्धा मध्य नागपूरमध्ये शिवसेनेसाठी जमेची मानली जात आहे.
नागपूर शहरात महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला पहिले खाते मध्य नागपूरनेच उघडून दिले होते. 1997 च्या महापालिकेच्या निवडणुकीत किशोर पराते हे निवडून आले होते. या मतदारसंघातून सर्वाधिक 11 नगरसेवक आजवर शिवसेनेचे निवडून आले आहेत.
शिवसेनेचे बोट पकडून सध्या मोठा भाऊ झालेल्या भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये पूर्व आणि दक्षिण नागपूर हे दोन विधानसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडण्यात आले होते. पूर्वमधून चार आणि दक्षिणेतून तीन वेळा शिवसेना आजवर लढली. मात्र, 35 वर्षांत एकालाही खाते उघडता आले नाही. हा सर्व इतिहास बघून आत विधानसभेचा मतदारसंघच बदलण्याच्या हालचाली शिवसेनेने सुरू केल्या असल्याचे समजते.
मुस्लिम बहुल असल्याने मध्य नागपूर एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. माजी मंत्री अनिस अहमद या मतदारसंघाचे नेतृत्व करीत होते. मागील पंधरा वर्षांपासून भाजपचे या मतदारसंघावर वर्चस्व आहे. विकास कुंभारे हे आमदार आहेत. भाजप आणि हलबा असे त्यांच्या विजयाचे समीकरण राहिले आहे. महाविकास आघाडी, मुस्लिम, हलबा एकत्र आल्यास शिवसेनेला मध्य नागपूरमधून खाते उघडण्यास अवघड नाही, असे आडाखे बांधले जात आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत मध्ये नागपूरमध्ये भाजपचे ( bjp ) विकास कुंभारे यांचा विजय झाला होता. आमदार कुंभारे यांनी काँग्रेसच्या बंटी बाबा शेळके यांचा पराभव केला होता. विकास कुंभारे यांना 75 हजार 692 मते मिळाली. तर, बंटी बाबा शेळके यांना 71 हजार 684 मते पडली. अवघ्या 4 हजार 8 मतांनी विकास कुंभारे यांचा विजय झाला होता. जर, ही जागा ठाकरे गटाच्या वाट्याला आली, तर येथे भाजप विरुद्ध ठाकरे गटात थेट लढत होऊ शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.