

नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात नेतेमंडळी मजेशीर व वादग्रस्त विधानं करत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हिंगणघाटच्या सभेत विनोदी टिप्पणी केली.
फडणवीस यांनी आमदार समीर कुणावार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे वर्ध्यासाठी 400-बेड हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज मंजूर झाल्याचे सांगितले.
कुणावार यांच्या सातत्यामुळे मेडिकल कॉलेजचे काम लवकरच सुरू होणार असून, पुढील मागण्याही त्यांनी सभेतच मांडल्याचे फडणवीस यांनी हसत सांगितले.
Nagpur, 28 November : नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत नेतेमंडळींकडून बेताल, मजेशीर विधान केली जात आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘लक्ष्मी दर्शना’च्या विधानावरून चोवीस तासांतच यू टर्न घेतला आहे. गिरीश महाजनांनीही बांधकाम मजुराबाबत बेताल विधानं केलं आहे. त्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट नगरपालिका निवडणुकीत बोलताना मश्किल विधान केले आहे.
आमदार समीर कुणावर (MLA Sameer Kunawar) यांचं मी मनापासून अभिनंदन करेन. आम्ही जेव्हा वर्धा जिल्ह्याला मेडिकल कॉलेज देण्याचा निर्णय केला. त्या वेळी जोपर्यंत मेडिकल कॉलेज आम्ही मंजूर करत नाही, तोपर्यंत समीरभाऊंनी आमचा पिच्छाच सोडला नाही. तुम्ही बघा गेल्या तीन ते चार वर्षांपूर्वी मला जास्त केसं होती. पण आता कमी झाली आहेत, ती समीरभाऊंच्या पाठपुराव्यामुळेच कमी झाली आहेत, असे मजेशीर विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, आमदार कुणावार हे एखाद्या कामाचा एवढा पाठपुरावा करतात की. एकदा त्यांनी मनावर घेतलं, तर ते त्यांचं काम मंजूर झाल्याशिवाय हे पिच्छाच सोडत नाहीत. ते माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, ‘आम्हाला मेडिकल कॉलेज पाहिजे.’ मी म्हटलं तुम्हाला मेडिकल कॉलेज मिळूच शकत नाही. कारण त्यासाठी अट आहे. चारशे बेडचे हॉस्पिटल लागतं. तुमच्याकडे चारशे बेडचे हॉस्पिटल नाही. मग तुम्हाला कसं मेडिकल हॉस्पिटल द्यायचं?
माझ्या युक्तीवादावर समीर कुणावार म्हणाले, मग पहिलं चारशे बेडचं हॉस्पिटल द्या. त्यावर मी म्हटलं मग हे तर असं झालंय की, तुम्ही माझ्याकडे पूल मागायला आला आहात. मी सांगितलं की तुमच्या गावात नदीच नाही. मग तुम्ही म्हणता अगोदर नदी आणा आणि मग पूल बांधा. पण त्यांनी माझा काही पिच्छा सोडला नाही. त्यांनी पहिले चारशे बेडचं हॉस्पिटल मंजूर करून घेतलं. त्यानंतर हॉस्पिटलचं टेंडर झालं आणि वर्क ऑर्डर निघाली आहे. त्याचं काम आता सुरू करायचं आहे. या निवडणुकीनंतर मी त्याच्या भूमिपूजनाला येणार आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
ते म्हणाले, जसं चारशे बेडचं हॉस्पिटल मंजूर झालं. तसा समीर कुणावार यांनी दावा केला की, आता आमच्याकडं चारशे बेडचं हास्पिटल आहे. आमच्याकडे मेडिकल कॉलेजही करा. तेही आपण मंजूर केले आहे. त्याचही काम आता लवकरच सुरू होणार आहे. आगामी काळात अत्याधुनिक असं मेडिकल कॉलेज उभारलं जाणार आहे. मी म्हटलं हॉस्पिटल झालं, मेडिकल कॉलेज झालं आता कुणावार यांचं समाधान होईल. पण, त्यांनी आजही दोन तीन मागण्या करूनच टाकल्या. त्या मेडिकल कॉलेजमध्ये काय काय पाहिजे, हेही त्यांनी सांगितलं आहे.
प्र. फडणवीस यांनी सभेत काय विनोदी विधान केले?
उ: समीर कुणावारांच्या पाठपुराव्यामुळे स्वतःची केस कमी झाल्याची मजेशीर टिप्पणी केली.
प्र. मेडिकल कॉलेजसाठी पहिली अट काय होती?
उ: 400 बेडचे हॉस्पिटल असणे आवश्यक होते.
प्र. हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजची कामे काय स्थितीत आहेत?
उ: हॉस्पिटलचे टेंडर आणि वर्क ऑर्डर निघाले असून, मेडिकल कॉलेजही मंजूर झाले आहे.
प्र. कुणावार यांची भूमिका कशी सांगितली गेली?
उ: अत्यंत सातत्यपूर्ण, काम मंजूर होईपर्यंत पिच्छा न सोडणारे नेते म्हणून.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.