IPS Transfer : हुश्श.. अमितेश कुमारांची बदली; आरटीओ, सना प्रकरणातील अनेकांना दिलासा

RTO & Sana Case: उघड झालेल्या भ्रष्टाचाराचा तपास थंडावणार? सना प्रकरणातही काहींना आनंद
Amitesh Kumar & Nagpur RTO
Amitesh Kumar & Nagpur RTOSarkarnama
Published on
Updated on

Nagpur : आरटीओ निरीक्षक गीता शेजवळ आणि संकेत गायकवाड यांच्यातील गोळीबारमुळे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुंतलेल्या अनेकांनी आता सुटकेचा श्वास घेतला आहे. असाच आनंद भाजपच्या पदाधिकारी सना खान त्यांच्या हत्याप्रकरणात नाव आलेल्यांनाही झाला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली प्रक्रियेत नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि दोन्ही प्रकरणांचा तपास करणारे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त (DCP Crime) मुमक्का सुदर्शन या दोघांचाही नंबर लागला आहे.

गीता शेजवळ आणि संकेत गायकवाड यांच्यातील गोळीबार प्रकरण 2022 मधील होते. याप्रकरणात गायकवाड यांनी पायावरून उंदीर गेल्यानंतर शासकीय बंदूक खाली पडली व त्यातून गोळी सुटल्याचे सांगितले होते. शासकीय अधिकारी असल्याने पोलिसांनीही या कथनावर विश्वास ठेवत केवळ नोंद घेतली होती.

Amitesh Kumar & Nagpur RTO
Nagpur Firing : आरटीओ प्रकरणात खळबळजनक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती

सुरुवातीला अनावधानाने गोळी सुटल्याचे दिसणाऱ्या या प्रकरणात काही तरी संशयास्पद असल्याचा गंध पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना आला. त्यामुळे त्यांनी याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखा पोलिसांकडे सोपविला. तपास पुन्हा सुरू होताच 2022 मध्ये सुटलेल्या त्या गोळीमुळे पोलिसांना अनेकांवर निशाणा साधता आला. आरटीओ पथकांनी केलेल्या वसुलीच्या पैशांचा हिशोब न जुळल्याने गीता शेजवळ यांनीच संकेत गायकवाड यांच्यावर गोळी झाडल्याचे तपासात आढळले.

तपासानंतर पोलिसांनी आरटीओ निरीक्षक गीता शेजवळ यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा तर संकेत गायकवाड यांच्याविरोधात पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा नोंदविला. याप्रकरणात गडचिरोलीचे डेप्यूटी आरटीओ विजय चव्हाण व त्यांच्या पत्नीचीही सखोल चौकशी झाली. नागपूरच्या शंकर नगरातील एका आलीशान हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले, ज्यात काही आरटीओतील अधिकारी हिस्सेवाटी करताना दिसले. त्यामुळे याप्रकरणात भ्रष्टाचाराचेही कलम लागणार होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आयुक्त अमितेश कुमार यांनी कोणत्याही दबावाला न जुमानता भाजप नेत्या सना खान हत्या आणि आरटीओ गोळीबार प्रकरणातील तपास पुढे नेला. या दोन्ही प्रकरणांमुळे अमितेश कुमार हे अनेकांच्या ‘गले की हड्डी’ बनले होते. तशीच काहीसे मुमक्का सुदर्शन हे देखील अडचणीचे ठरले होते. सना खान आणि आरटीओतील गोळीबार ही दोन्ही प्रकरणे ‘हायप्रोफाइल’ व अनेक अधिकारी, राजकीय व्यक्तींचा सहभाग असलेली आहेत. त्यामुळे अमितेश कुमार यांची बदली व्हावी, यासाठी अनेकांनी मुंबईवाऱ्या सुरू केल्या. काहींनी देव पाण्यात बुडवून ठेवले.

नागपुरात चांगले काम केल्यामुळे अमितेश कुमार यांना शासनाने अलीकडेच मुदतवाढ दिली होती. परंतु जसजसा सना खान आणि आरटीओ गोळीबार प्रकरणातील तपास पुढे सरकत होता. तसतसा अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकत होता. दोन्ही प्रकरणांमध्ये दररोज नवीन धक्कादायक माहिती पुढे येत होती. आरटीओ प्रकरणात तर गीता शेजवळ या थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपले ‘गॉडफादर’ असल्याचे खुलेआम सांगतात, असा आरोप काँग्रेसने केला होता. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहशहरातील या दोन्ही प्रकरणांमुळे नागपूर पुन्हा एकदा राज्यात चर्चेत आले होते.

Amitesh Kumar & Nagpur RTO
Sana Khan Murder : सना खान हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पप्पूच्या लॅपटॉपमधून 'ही' धक्कादायक माहिती समोर

दोन्ही प्रकरणांची झळ आपल्यापर्यंत पोहचू नये, यासाठी अनेक जण प्रयत्नरत होते. अशात लोकसभा निवडणुकीमुळे अमितेश कुमार व मुमक्का सुदर्शन यांची नागपुरातून बदली करण्याचा निर्णय नाईलाजाने (?) सरकारला घ्यावा लागला. पण त्यामुळे सना खान आणि आरटीओ गोळीबार प्रकरणाशी संबंधित सर्वांनाच थोडक्यात बचावल्याचे वाटत आहे.

सीपींसोबत डीसीपीही गेले!

आयुक्त अमितेश कुमार आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त मुमक्का सुदर्शन या दोन्ही आयपीएस अधिकाऱ्यांनी कोणत्याही दबावाला न जुमानता सना खान आणि आरटीओ प्रकरणात सखोल तपास सुरू केला होता. बदलीनंतर अमितेश कुमार यांना पुण्याला तर मुमक्का सुदर्शन यांना चंद्रपूरला पाठविण्यात आले आहे. एकाच वेळी दोन ‘हायप्रोफाईल’ प्रकरणांशी संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांची बदली झाल्याने तपासाच्या फाइलचे काय होणार, याची कल्पना केली जाऊ शकते. अमितेश कुमार यांच्या जागेवर आता रवींद्र सिंघल हे नवे आयुक्त म्हणून येत आहेत. सना खान आणि आरटीओ प्रकरणातील तपास पुढे नेण्यासाठी ते किती तत्परता दाखवितात, यावर या दोन्ही प्रकरणांचे भवितव्य अवलंबून असल्याचे सांगण्यात येत आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Amitesh Kumar & Nagpur RTO
Sana Khan Murder Case : सना खान प्रकरणात नागपुरातील भाजप नेते, गृहमंत्री फडणवीसांना पत्र देणार !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com