
Gadchiroli News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा लवकरच होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षाकडून निवडणुकीची तयारी केली जात आहे. येत्या काळात महायुती होणार असल्याची घोषणा केली जात असली तरी स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जाईल असे सांगितले जात आहे. प्रत्येक ठिकाणचे स्थानिक समीकरणे वेगवेगळी असल्याने आता महायुतीमधील मित्रपक्षाकडून एकमेकांवर कुरघोडी केली जात आहे.
ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीतच अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या आमदाराने मोठा आरोप केला आहे. विधानसभा निवडणुकीत माझा पराभव करण्यासाठी भाजपने पाच कोटी रुपये देऊन पुतण्याला डमी उमेदवार म्हणून उभे केल्याचा आरोप गडचिरोली जिल्ह्यातील अहिरेचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केला. त्यांच्या या आरोपामुळे निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच वातावरण तापले आहे.
आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केलेल्या या आरोपामुळे महायुतीमध्ये पहिली ठिणगी पडली आहे. त्यामुळे आता गडचिरोली जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादी (NCP) हे महायुतीतील पक्षच एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता येथील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यासोबतच येत्या काळात अशा प्रकारामुळे महायुतीमधील मित्र पक्षातच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी येत्या काळात रंगणार आहेत.
येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अहेरी विधानसभा मतदारसंघात कोणता पक्ष किती जागा लढवायच्या आणि कुणाला किती जागा द्यायच्या हे मी ठरवणार असल्याचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी स्पष्ट केले. येत्या निवडणुकीत अहिरेत फक्त घड्याळच चालणार असल्याचे सांगत, भाजपला (BJP) एकही जागा सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
माझ्या विरोधात भाजपने माझ्या पुतण्याला डमी उमेदवार म्हणून उभे केले. मला हरवण्यासाठी भाजपने 5 कोटी रुपये माझ्या पुतण्याला दिले. परंतु मला त्यांना सांगायचं आहे की मी त्यांना एक तुकडा सुद्धा देणार नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझ्या क्षेत्रात फक्त घड्याळच चालणार आहे. एकही जागा आम्ही दुसऱ्या पक्षाला देणार नाही. माझ्या मतदारसंघात कोण किती जागा लढल्या पाहिजेत आणि कुणाला किती जागा दिल्या पाहिजेत हे मी ठरवणार, असल्याचे आत्राम म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून धर्मरावबाबा आत्राम यांच्यासमोर शरद पवार गटाच्या उमेदवार आणि आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांचे आव्हान होते. तर धर्मरावबाबा आत्राम यांचे पुतणे राजे अंबरीशराव आत्राम हे देखील निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून उभे होते.
अहेरी मतदारसंघात कौटुंबिक सामना रंगला होता. या निवडणुकीत अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे धर्मरावबाबा आत्राम यांचा विजय झाला. त्यामध्ये धर्मराव बाबा आत्राम यांना 53 हजार 978 मते मिळाली. तर त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांना 35 हजार 569 मते मिळाली. अपक्ष उमेदवार राजे अंबरीश यांनी 37 हजार121 मते मिळाली होती.
महायुतीच्या नेतेमंडळींकडून वारंवार एकत्र लढणार असल्याचे सांगितले जात असले तरी, स्थानिक नेत्यांच्या या टोकाच्या भूमिकेमुळे युतीचे सामंजस्य धोक्यात आले आहे. हा वाद वेळीच मिटला नाही, तर याचा परिणाम विधानसभा निवडणुकीच्या समीकरणांवरही होऊ शकतो. हा वाद फक्त एका जागेचा नसून, महायुतीतील वर्चस्वाच्या लढाईचा संकेत देत आहे. त्यामुळे येत्या काळात महायुतीच्या समन्वय समितीकडून या वादावर काय तोडगा काढला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.