मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) हे अडचणीत आले आहेत. परमबीरसिंह यांनी जबरदस्तीने व्हॉट्सअॅप मेसेजला रिप्लाय करायला लावला, असा दावा सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) संजय पाटील (Sanjay Patil) यांनी केला आहे. परमबीरसिंह यांच्यावरील दाखल आरोपपत्रातून हा गौप्यस्फोट झाला आहे.
गोरेगावमध्ये दाखल खंडणीच्या गुन्ह्यात परमबीरसिंह यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. व्यावसायिक बिमल अगरवाल यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती. परमबीरसिंह आणि इतर पाच आरोपींनी अगरवाल यांच्या दोन बारवर छापा न टाकण्यासाठी 9 लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याच आरोपपत्रात एसीपी संजय पाटील यांना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवलेला जबाबही आहे.
परमबीरसिंह यांनी जबरदस्तीने व्हॉट्सअॅप मेसेजला रिप्लाय करायला लावला, असे पाटील यांनी म्हटले आहे. याच मेसेजच्या आधारेच देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. सिंह आणि पाटील यांच्यातील मेसेजमध्ये देशमुख आणि त्यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे यांच्या भेटीचा उल्लेख होता. याचबरोबर देशमुखांनी बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला बार आणि रेस्टॉरन्टकडून वसुली करण्याचे आदेश दिल्याचेही मेसेजमध्ये म्हटले होते. आता हे मेसेज सिंह यांनी जबरदस्तीने पाटील करायला लावल्याने समोर आले आहे.
या प्रकरणात परमबीरसिंह यांच्यासोबत सचिन वाझे आणि आणखी चार आरोपी आहेत. त्यातील सुमितसिंह ऊर्फ चिंटू आणि अल्पेश पटेल यांना अटक करण्यात आली आहे. रियाज भाटी आणि विनयसिंह ऊर्फ बबलू हे फरार आहेत. याच प्रकरणात परमबीरसिंह यांना फरार गुन्हेगार घोषित करण्यात आले होते. मागील आठवड्यात हा आदेश रद्द करण्यात आला होता. सिंह यांच्या विरोधात आणखी चार प्रकरणात आरोपपत्र दाखल व्हायचे आहे. त्यांच्या विरोधातील हे पहिले आरोपपत्र आहे.
परमबीरसिंह हे 25 नोव्हेंबरला मुंबईत दाखल झाले होते. त्यावेळी त्यांची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशी सात तासांहून अधिक काळ चौकशी झाली होती. नंतर दुसऱ्या दिवशी ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्यांची चौकशी करण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांची गोरेगावमधील खंडणी प्रकरणात चौकशी करुन जबाब नोंदवला होता. या प्रकरणी परमबीरसिंहांच्या विरोधात पहिले आरोपपत्र दाखल झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.