Political Developments in Maharashtra: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत सामील होऊन एक वर्षांहून अधिक काळ झाला आहे. राष्ट्रवादी सहभागी झाल्यापासून महायुतील 'ऑल इज नॉट वेल' असं चित्र दिसत आहे.
मात्र, अजितदादा यांच्या राष्ट्रवादीनं महायुतीतून बाहेर पडून स्वतंत्र्य निवडणूक लढवावी, यासाठी भाजप आणि शिवसेनेकडून ( शिंदे गट ) जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याचं समजत आहे.
तसेच, अजितदादांची राष्ट्रवादी महायुतीतून 'एक्झिट' झाली, तर भाजप आणि शिंदे गटाला अधिक जागा लढता येतील, असा 'प्लॅन' आखला जात असल्याचं बातमी एका मराठी वृत्तपत्रानं सूत्रांच्या हवाल्यानं दिली आहे.
जुलै 2023 मध्ये अजितदादांनी (Ajit Pawar) काही आमदारांसह भाजप आणि शिवसेनेच्या ( शिंदे गट ) 'महायुती'त सामील होण्याचा निर्णय घेतला. 'भाजपसोबत युती केली, तरी विचारांशी तडजोड करणार नाही,' असं अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून सातत्यानं सांगण्यात आलं. मात्र, महायुतीत भाजप, शिंदे गट विरुद्ध अजितदादांच्या राष्ट्रवादीत खटके उडत आहेत.
शिंदे गट आमदार संजय गायकवाड आणि भाजप खासदार अनिल बोंडे यांनी काँग्रेस नेते, राहुल गांधी यांची 'जीभ छाटण्याची', 'जीभेला चटके देण्या'ची भाषा केली होती. यानंतर 'वाचाळवीरांनी बोलताना मर्यादा पाळावी,' अशी तंबी अजितदादांनी दिली होती.
त्यासह आमदार नितेश राणे यांनी मुस्लिमांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर अजितदादांनी केंद्रातील वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला होता. 'नितेश राणे बेताल वक्तव्य करत असतील, तर जाहीर निषेध करतो,' असं सुनील तटकरे यांनी म्हटलं होतं.
मात्र, 'अजितदादांना कुठे तक्रार करायची करू द्या,' असं प्रत्युत्तर आमदार नितेश राणे यांनी दिलं होतं. परंतु, महायुतीत अजितदादांच्या राष्ट्रवादीची कोंडी करण्यासाठी अशी प्रशोभक भाषा वापरत असल्याचं बोललं जात आहे.
भाजप (BJP), शिंदे गटाचा काँग्रेसविरोधी आणि कट्टर हिंदुत्त्ववादाचा पवित्रा अजितदादांना मान्य नसेल, तर त्यांनी महायुतीतून 'एक्झिट' व्हावं, अशी अप्रत्यक्षपणे 'वॉर्निंग' एकप्रकारे दिली जात असल्याचं सांगितलं जाते.
अन्यथा बाहेर पडावे लागणार...
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 80 जागांची मागणी होत आहे. मात्र, अधिक जागा आपल्याकडे खेचून अजितदादांना कमी जागा देण्याची रणनीती भाजप आणि शिंदे गटानं आखली आहे. त्यामुळे कमीत-कमी जागांवर अजितदादांच्या राष्ट्रवादीला निवडणूक लढवावी लागणार आहे.
ही वाटाघाट स्वीकारायची नसेल, तर महायुतीतून बाहेर पडून लढण्याशिवाय अजितदादांच्या राष्ट्रवादीपुढे पर्याय उरणार नाही. त्यामुळे जागावाटपाचं कारण देत अजितदादांची राष्ट्रवादी महायुतीतून स्वत: 'एक्झिट' मारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महायुतीतून बाहेर पडल्यास अजितदादांची राष्ट्रवादीला किमान 60 जागांवर उमेदवार उभे करता येतील. तिथे महाविकास आघाडी, अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजप-शिंदे गट, असा तिहेरी सामना होऊ शकतो.
राष्ट्रवादीतून बाहेर पडताना अजितदादांसोबत 40 आमदार आले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत चार जागा लढलेल्या राष्ट्रवादीला फक्त एका ठिकाणी विजय मिळवता आला. तोच फटका विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.
मात्र, विधानसभेला 10 ते 15 आमदार जरी निवडून आले, तरी अजितदादांचे महत्त्व युती आणि महाविकास आघाडीसाठी वाढू शकते. त्यामुळे राजकीय ताकद वाढवण्यासाठी स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय अजितदादा घेऊ शकतात, असं बोललं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.