संजय परब
Mumbai Political News: उद्धव ठाकरे, स्टॅलिन, ममता बॅनर्जी आणि सोनिया गांधी हे सगळेजण आज एकवटले आहेत. कारण या सर्वांना राजकारण करुन कुटुंबाचं भलं करायचं आहे. उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला म्हणजेच आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं आहे, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री आमित शाह यांनी केले आहे. ते एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.
अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात 2019 मध्ये बंद दाराआड एक चर्चा झाली होती. या चर्चेत सगळं काही 50 टक्के वाटप भाजपा आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये होईल, असं ठरल्याचं उद्धव ठाकरे सांगतात. तर मुख्यमंत्रिपदाबाबत काहीही आश्वासन दिलेलं नव्हतं. उद्धव ठाकरे हे धडधडीत खोटं बोलत आहेत, असं अमित शाह म्हणतात. हा वाद इतका टोकाला गेला की भाजपपासून फारकत घेत उद्धव ठाकरे यांनी वेगळी चूल मांडत महविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाल्याने भाजपचा अंगाची लाहीलाही झाली असून अजूनही ती कमी झालेली नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेना युती तुटल्यापासून अमित शाह हे उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे. महाविकास आघाडीचं सरकार 2022 मध्येच गेलं आहे. मात्र उद्धव ठाकरेंवर टीका करणं आणि उद्धव ठाकरेंनी त्याला उत्तर देणं हे सुरुच आहे. आता थेट घराणेशाहीवरुनच उद्धव ठाकरेंवर अमित शाह यांनी आरोप केला आहे.
"इंडिया ही आघाडी वगैरे काही नाही. ही आघाडी म्हणजे काही सत्तालोलुप पक्षांचं एकत्र येणं आहे. या लोकांना आपल्या मुलांना, पुतण्याला, भाच्याला मुख्यमंत्री किंवा मंत्री किंवा पंतप्रधान बनवायचं आहे. राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत हे सोनिया गांधी यांचं लक्ष्य आहे. तर उद्धव ठाकरेंना त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं आहे. स्टॅलिन यांनाही त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं आहे. ममता बॅनर्जी यांना त्यांच्या भाचीला सत्तेत आणायचं आहे. यात आघाडी कुठे आहे ? या लोकांना फक्त आपल्या कुटुंबाचं भलं करायचं आहे", अशी बोचरी टीका शाह यांनी केली.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप देशभर मोर्चेबांधणी करत आहे. एका बाजूला इंडिया आघाडीतले पक्ष आपसात जागावाटप करण्यासंदर्भात चर्चा करण्यात व्यस्त आहेत. तर दुसऱ्या बाजूला भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये विरोधी पक्षांमधून नेत्यांचं इनकमिंग चालू आहे. गेल्या काही महिन्यांत विरोधी पक्षांमधील अनेक नेत्यांनी भाजपात आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये प्रवेश केला आहे.
त्यामुळे देशात एनडीएची ताकद वाढू लागली आहे. दोन महिन्यांपूर्वी बिहारमधील भाजपाचे जुने सहकारी नितीश कुमारही एनडीएत परतले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला आहे. दरम्यान, आता महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी युती करणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
संयुक्त शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची तीन दशकांहून अधिक काळ युती होती. दोन्ही पक्षांच्या युतीने राज्यात दोनदा सत्तास्थापन केली. भाजपाने केंद्रात स्थापन केलेल्या सरकारांमध्ये शिवसेनेला स्थान दिलं होतं. सध्या शिवसेनेचा शिंदे गट एनडीएचा सदस्य आहे. अशातच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची एनडीएत परतण्याची इच्छा असेल तर भाजप त्यांचं स्वागत करेल का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिलं आहे.
मातोश्री आणि भाजपाची जुनी मैत्री आहे. हे दोन मित्र पुन्हा एकत्र येतील का ? यावर अमित शाह सांगतात, या जर-तरच्या चर्चेला काहीच अर्थ नाही. तुम्ही असा प्रश्न मला विचारून तुम्हाला हेडलाईन मिळणार नाही. तुम्ही मला आगामी निवडणुकीबाबत प्रश्न विचारा. अन्यथा तुमची वेळ संपेल. शाह यांनी एकप्रकारे उद्धव ठाकरेंबाबतच्या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं.
अमित शाह (Amit Shah) यांनी मातोश्रीवर टीका केल्यानंतर शिवसेनेचे खासदार यांनी त्याला रोखठोक उत्तर दिलंय. "लोकांच्या घराणेशाहीवर बोलण्यापूर्वी अमित शाह यांनी स्वतःच्या घरात डोकावून बघावे. त्यांचा मुलगा जय शाह हा अचानक जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना बीसीसीआयच्या सचिवपदी कसा काय निवडला जातो ? त्याने काय सचिन तेंडुलकरसारखी सर्वाधिक शतके झळकावलीत की विराट कोहलीप्रमाणे षटकार मारलेत. अमित शाह नसते तर आज जय या महत्वाच्या जागी नसता".
(Edited By-Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.