Mumbai News : लोकसभा निवडणुकीसाठी देशभरासह पाच टप्पे पूर्ण झाले असून शनिवारी(ता.24) दुसरा टप्पा पार पडणार आहे.पण महाराष्ट्रातली मतदान प्रक्रिया संपली आहे.निवडणुकीची धामधूम संपताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची डोकेदुखी वाढली आहे.
शिवसेना शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.गजानन कीर्तीकर यांच्या दाव्यानंतर त्यांच्याविरोधात एक गट आक्रमक झाला असून त्यांच्यावर कारवाई करणार येणार असल्याचेही बोलले जात आहे.त्याचवेळी आता दुसरीकडे कीर्तीकरांच्या बचावासाठी दुसरा गट मैदानात उतरला आहे.त्यामुळे वातावरण तापलं आहे.अशातच आता माजी खासदार आनंदराव आडसूळ यांनी कीर्तीकरांचा बचाव करतानाच काही धक्कादायक दावे केले आहे.
आनंदराव आडसूळ यांनी शुक्रवारी (ता. 24) मीडियाशी संवाद साधला.यावेळी त्यांनी अमरावतीच्या भाजप उमेदवार नवनीत राणा या नाटकबाज असून त्यांचा यंदाच्या निवडणुकीत पराभव होणार असल्याचं म्हटलं आहे.याचवेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने बऱ्यापैकी आघाडी घेतली आहे. हे मान्य करावे लागेल.विरोधकांच्या एकजुटीचा फटका नक्कीच महायुतीला बसण्याची शक्यता आहे असं धक्कादायक विधान त्यांनी केलं आहे.
शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांनी इंडिया आणि महाविकास आघाडीवर मोठं भाष्य केले.ते म्हणाले,मी पक्षाला बांधील असलो तरी मी चुकीचं बोललं म्हणून खरं ठरू शकत नाही आणि खरं बोललो म्हणून चुकीचं होऊ शकत नाही.पण एक गोष्ट आपल्या मान्य करावीच लागेल की,महाविकास आघाडीने बऱ्यापैकी आघाडी घेतली आहे.हे मान्य करावे लागेल.
राज्यातील आणि देशातील वातावरण पाहिले तर महाविकास आघाडीचं वातावरण आहे,हे आपल्याला स्वीकारावं लागेल.विरोधकांनी बऱ्यापैकी एकजूट निर्माण केली.एकमेकांच्या हातात हात घालून चांगलं काम करत आहेत.विरोधकांच्या एकजूटीला महायुतीला नक्कीच फटका बसेल.ज्यात स्पर्धा आहे.हे पहिल्यांदा स्वीकारावं लागेल असंही ते म्हणाले आहेत.
राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
याचवेळी आनंदराव आडसूळ यांनी गजानन कीर्तिकर यांच्या दाव्याशी मी सहमत असल्याचेही ठणकावून सांगितले.ते म्हणाले,शिशिर शिंदे कोण आहेत? गजाभाऊंनी शिवसेनेसाठी आयुष्य खर्ची केलं. लोकांना मोठी मदत केली आहे. शिशिर शिंदे कोठून आला.मनसेतून इकडे आला. मुलाचे काम करु शकलो नाही याची खंत वाटणे गुन्हा आहे का? अशी उलट विचारणाही त्यांनी यावेळी केली.
महायुतीत भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाच्या नेते आनंदराव आडसूळ यांनी अमरावतीच्या भाजप उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) पराभूत होणार असल्याचा दावा केला आहे. यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
मागच्या निवडणुकीत मी हरलो नाही. हरवलो गेलो. मी कोणाचे नाव घेणार नाही. मात्र, वेळ आली तर नाव देखील घेणार, असा सज्जड इशारा देखील आनंदराव अडसूळ यांनी दिला. फक्त नाटकबाजी, नाटक करतात. कोणा महिलेच्या घरी जावून पोळ्या लाटतात. स्वतःच्या घरी कधी पोळी लाटली का? आदिवासी महिलांमध्ये जावून फेर धरायचा, दहीहंडीचा कार्यक्रम करायचा, एखाद्या अभिनेत्याला आणयचं. फक्त नाटक, लोकांना आवडलं नसल्याचा हल्लाबोल अडसूळ यांनी नवनीत राणांवर केला.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.