Mumbai News : बीडमधील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी दिवसागणिक नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहे. याप्रकरणावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. यातच भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून सातत्यानं राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि त्यांचे समर्थक वाल्मिक कराडवर गंभीर आरोप करुन त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच आता बीडप्रकरण उचलून धरणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) मोठी प्रतिक्रिया दिलीच,शिवाय सुरेश धसांनाही फटकारलं आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (ता.28) मीडियाशी संवाद साधला.यावेळी त्यांनी अंजली दमानिया,सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य केलं.ते म्हणाले, बीडमधील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी सीआयडी, एसआयटी, न्यायालयीन अशा चौकशा सुरू आहेत. अंजली दमानिया यांनी जी कागदपत्रे दिली. ती सीआयडी आणि एसआयटीकडे दिली आहेत. कुणी पुरावे दिले तर त्याची शहानिशा करावी लागते, म्हणून ते सीआयडी आणि एसआयटीकडे देण्यात आले आहेत. जी वस्तुस्थिती समोर येईल त्यानुसार पुढच्या गोष्टी काय करायच्या ते ठरवलं जाईल.
मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी पण यापूर्वी सांगितलं आहे. ज्याप्रकारे बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुखांच्या बाबतीत घडलं आहे,त्याच्या चौकशा सुरू आहेत. आणि या चौकशीत जे कुणी दोषी असतील, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असा प्रयत्न आम्ही करतोय. जी काही चौकशी चालू आहे,त्याच्यात आणखी कुणाची नावं आली तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. परंतु, जर कुणाचा त्या प्रकरणाशी काहीही संबंधच नसेल तर कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही, असं अजित पवारांनी सांगितलं.
जर दोषी असतीलतर निश्चितपणे कुणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही,हीच भूमिका माझीपण आणि मुख्यंमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पण आहे. सुरेश धस यांना काय वाटतंय याच्याशी मला काही देणंघेणं नाही. मी या सरकारमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करत असतो. महायुतीचं सरकार चालवत असताना आम्ही प्रमुख लोकं बसतो आणि निर्णय घेत असतो. जर वेगवेगळ्या पक्षांतले खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अर्थच राहणार नाही,अशा शब्दांत अजित पवारांनी भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांना फटकारलं आहे.
अजित पवार म्हणाले, त्या संदर्भात जी काही भाजपची भूमिका असेल ती अमित शाह, देवेंद्र फडणवीस,चंद्रशेखर बावनकुळे,जे.पी.नड्डा आम्हांला सांगतील,हे बरोबर आहे ना.त्याचवेळी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर आरोप लावणारे ते नेतेमंडळी नाहीत,ते खालचे कार्यकर्ते आहेत.
आता तुम्ही कुणाला नेते समजतात, ते मला माहीत नाही.याचवेळी त्यांनी मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहे असल्याचंही अजित पवारांनी सांगितलं. मी ज्यांना नेते समजतो ते वेगळे आहेत. आणि तुम्ही ज्यांना नेते समजतात ते माझ्या दृष्टीनं पक्षाचे नेते नाहीत असा टोलाही अजित पवारांनी यावेळी आमदार सुरेश धसांना लगावला.
पण ज्या क्रूर पध्दतीनं सरपंचाची हत्या झालेली आहे. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. तसेच त्यांचं कुणीही समर्थन करु शकत नाही. त्यामुळे ज्यांनी कुणी हे दृष्कृत्य केले आहे. त्यांना फासावर लटकवण्यासाठी आमचं सरकार कटिबध्द आहे, असा पुनरुच्चारही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.