Maharashtra Assembly Election 2024 Exit Poll : महाराष्ट्र विधानसभेसाठी बुधवारी (ता.20) मतदान पार पडलं आहे. मात्र, मतदान प्रक्रिया पार पडताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनातील अग्रलेखातून निवडणूक आयोगावर सडकून टीका केली आहे. तसंच काल पार पडलेल्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाकडून हजारो कोटी रुपयांचा चुराडा केल्याचा आरोपही त्यांनी या अग्रलेखातून केला आहे.
मतदानाआधी एक दिवस भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) हे ज्या विवांता हॉटेलमध्ये थांबले होते. तिथे ते भाजपच्या लोकांना पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) आणि क्षितीज ठाकूर यांनी केला होता. त्यानंतर जवळपास चार ते पास झालेल्या नाट्यमय घडामोडी महाराष्टातील जनता बघत होती. मात्र, याबाबत कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप आता राऊत यांनी केला आहे.
त्यांनी सामनातील अग्रलेखात लिहिलं, 'निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव वगैरे म्हणण्याची प्रथा आहे, मात्र तो आता फक्त पैशांचा उत्सव झाला आहे. ज्या पद्धतीने या निवडणुकीत सत्ता पक्षांकडून पैशांचा वादळी पाऊस पडत राहिला त्यावरून हेच म्हणावे लागेल. हे चित्र आपल्या लोकशाहीसाठी चांगले नाही. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सांगितले आहे की, या निवडणुकीत त्यांची प्रतिमा भंग करण्यासाठी भाजपने (BJP) पाचशे कोटी रुपयांचा खुर्दा केला.
महाराष्ट्रात हा आकडा दोन हजार कोटींवर नक्कीच गेला असेल. मतदानाच्या एक दिवस आधी मुंबई, विरार-नालासोपारा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर अशा ठिकाणी कोटय़वधींचे खोके सापडले आणि हे वाटप भाजप (BJP) व मिंधे यांचेच लोक करीत होते. मतदानाला काही तास उरले असताना पैशांची ही धरपकड झाली. याचा अर्थ याआधी पैसा मोठ्या प्रमाणात मतदारसंघांमध्ये पोहोचला व पोलिस बंदोबस्तात पैशांचे वाटप करून मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला.
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीस बट्टा लावण्याचा हा प्रकार बिनबोभाट घडत असताना आपला तो निवडणूक आयोग (Election Commission) झोपाच काढत असावा. नालासोपारा, विरार भागात भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे हे पैशांच्या बॅगा घेऊन एका हॉटेलात शिरले व वाटप सुरू करताच तेथे निवडणूक आयोगाचे लोक पोहोचले नाहीत, तर हितेंद्र ठाकुरांच्या बहुजन विकास आघाडीचे लोक पोहोचले. चार तास तावड्यांना घेराव घालून ‘जाम’ केले.
तावडे यांच्या खोलीत पैसे होते, पण निवडणूक आयोगाने वेळेत पंचनामा करून गुन्हा दाखल केला नाही. गुन्हा दाखल केला तो आचारसंहितेचा भंग केल्याबाबत. म्हणजे निवडणूक आयोगाचे नियम मोडून पत्रकार परिषद घेतली वगैरे किरकोळ विषयांवर. तावड्यांकडे पाच कोटी होते, पण आयोगाने फक्त नऊ लाख कागदावर आणले असा आरोप आमदार ठाकूर करत आहेत.
मग वरचा मलिदा सुखरूप बाहेर काढण्यासाठी पोलीस, आयोगाच्या लोकांनी कोणत्या दरवाजाचा वापर केला? सांगोल्याच्या टोल नाक्यावर मिंधे गटाच्या आमदारांचे पंधरा कोटी पकडले गेले होते, पण थातूरमातूर रक्कम जप्त करून उरलेली रक्कम ज्याची त्याला परत करून निवडणूक आयोग व पोलिसांनीही आपले मिंधेगिरीचे कर्तव्य पार पाडले, असा आरोप त्यांनी आयोगावर केला. तर सांगोल्यात गाडी व ड्रायव्हर हा सरळ आमदाराचा होता. तरीही त्यांना वाचविण्याचा थुकरटपणा हा केलाच.
नालासोपाऱ्यात ‘तावडे’ यांचा गेम मिंध्याने केला की भाजपमधील अन्य कोणी केला, हे रहस्यच आहे. कारण नंतर एक फोन आला व ठाकूर मंडळ त्याच तावड्यांसह कुठेतरी बसायला व बोलायला एकाच गाडीतून गेले. जनतेला मूर्ख बनविण्याचे हे खेळ लोकशाहीत सुरू आहेत. महाराष्ट्रात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पैशांचे वाटप झाले.
पैशांचा महापूरच आला. या महापुरात कोण कसे वाहून गेले व कोण निष्ठेच्या विटांवर तरले हे पुढच्या 72 तासांत कळेल, पण निवडणुका आता लोकशाहीचा उत्सव राहिला नसून भ्रष्ट पैशांचा उत्सव झाला हे नक्की.' अशा शब्दात राऊतांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.