Mumbai News : काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली, तर अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. अशोक चव्हाण यांच्याबरोबरच काँग्रेसचे अजून काही आमदार काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. (Congress resignation, MLA Ashok chavan)
या सर्व घडामोडीनंतर अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधत काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचं नेमकं कारण काय ? याबाबत आता मोठा खुलासा केला आहे. तसेच अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, स्वत: यासंदर्भात प्रतिक्रिया देत अद्याप आपण कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला नाही, पण पुढील दोन दिवसांमध्ये आपण आपली पुढील राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि विधिमंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यानंतर आता मला कोणाविरोधातदेखील तक्रार करायची नाही. जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो, तोपर्यंत मी प्रामाणिकपणे काम केलं. पुढील दोन दिवसांत मी माझी पुढील राजकीय भूमिका जाहीर करणार आहे. भाजपची राजकीय प्रणाली मला अद्याप माहिती नाही. त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा अद्याप विचार केलेला नाही. तसेच काँग्रेसमध्ये आपली कोणाबद्दलही तक्रार नाही. प्रत्येक गोष्टीला कारण असलं पाहिजे असं नाही. मला कोणाची उणीदुणी काढायची नाहीत. मला वाटलं आता वेगळ्या पर्यायाचा विचार केला पाहिजे, त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे. पण मी अद्याप कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही," अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.
अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसला ऐन निवडणुकीच्या तोंडावरच मोठा धक्का बसला. यानंतर अशोक चव्हाणांबरोबर काँग्रेसचे काही आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे चव्हाण यांच्यासोबत अजून कोण-कोण जाणार ? याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
(Edited By-Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.