Mumbai News : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडलाय. कोण कोणच्या संपर्कात, कोणचे सरकार येणार, महायुती की महाविकास आघाडी भारी भरणार, अशी चर्चा रंगली असतानाच, निवडणुकीच्या मैदानात उमेदवारांच्या नात्यागोत्यावर चर्चा देखील होऊ लागल्यात.
राज्याच्या निवडणुकीत सर्वत्र नातीगोती मैदानात असल्याची चर्चा असतानाच, सर्वाधिक लक्ष लागून राहिलेल्या मुंबईच्या निवडणुकीच्या मैदानात देखील नातीगोती असल्याचे दिसते. यात ठाकरेंपासून ते मलिकांपर्यंत सर्वांची राजकीय घराणी दिसतात. मुंबईतील निवडणूक ही राजकीय घराण्यांभोवती आणि नातीगोतींमध्ये भोवती असल्याचे दिसते.
विधानसभा निवडणुकीत (Election) मुंबईत नातीगोती उदंड झाल्याचे चित्र आहे. अनेक मतदारसंघात राजकीयदृष्ट्या वजनदार, विजयाची खात्री आणि राजकीय पक्षांबरोबरच असलेल्या कुटुंबीयांनी मोठी आघाडी उघडल्याचे दिसते. त्यामुळे लोकशाहीतील राजा म्हणून ओळखला जाणारा मतदार कोणाला कौल देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात 36 विधानसभा मतदारसंघ असून त्यामध्ये जवळपास 420 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये (MVA) या निवडणुकीत थेट लढत होणार असली, तरी मनसेमुळे काही ठिकाणी तिरंगी लढतीचे चित्र आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने जिंकण्याच्या क्षमतेबरोबरच राजकीय आणि आर्थिक ताकदीचा अंदाज घेत उमेदवारी दिल्याने अनेक मतदारसंघात भाऊ, बहीण, मुलगी असे नात्यागोत्यातील उमेदवार असल्याचे दिसते. यामुळे सत्तेचे केंद्रीकरण होण्याची भीती आहे.
वरळी, वांद्रे आणि माहीम हे तिन्ही ठिकाणी मुंबईचे हार्ट म्हणून ओळखले जातात. या तिन्ही ठिकाणी ठाकरे घरण्याचे वर्चस्व दिसते. ठाकरे घरण्यातील आदित्य ठाकरे स्वतः महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून वरळी मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत, तर त्यांचे मावस भाऊ वरुण सरदेसाई वांद्रे पूर्व म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत.
त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांचे चुलत भाऊ आणि राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून मनसेचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. याशिवाय शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत हे विक्रोळी विधानसभेतून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.
भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार वांद्रे पश्चिममधून महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत, तर त्यांचे बंधू विनोद शेलार मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचे नवाब मलिक हे महायुतीचे उमेदवार म्हणून मानखुर्द शिवजीनगर मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत, तर त्यांची मुलगी सना मलिक या अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार आहेत.
उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर या जोगेश्वरी विधानसभेतून महायुतीच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. उत्तर मध्य मुंबईच्या खासदार आणि काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांची बहीण असलेल्या डॉ. ज्योती गायकवाड या महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून धारावी विधानसभेतून निवडणूक लढवत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.