
Mumbai News, 24 Jan : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गुरूवारी (ता.23 जानेवारी) बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिवस होता. याच निमित्ताने ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी 'ढोंग बंद करा आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना (Babasaheb Thackeray) भारतरत्न द्या'; अशी थेट मागणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला होता.
तर ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी देखील काल बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न देण्याची मागणी केली. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने (Shivsena) देशाला हिंदुत्ववादी विचार दिले आहेत. आज स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या सरकारने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांना भारतरत्न द्यावा, असं सावंत म्हणाले. ठाकरेंच्या शिवसेनेकडून भारतरत्न देण्याची मागणी केली जात आहे.
अशातच आता येत्या 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी केंद्र सरकारकडून भारतरत्न पुरस्काराची घोषणा होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याचे आदेश केंद्र सरकारला द्यावेत अशी मागणी करणारं पत्र ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना दिलं आहे.
त्यांनी या पत्रात लिहिलं, मराठी भाषा आणि मराठी माणसांसाठी बाळासाहेब ठाकरेंनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं आहे. ते एक करिश्मा असलेले नेते होते, ते सामान्य माणसाचा आवाज बनले होते. मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी त्यांनी लढा दिला. समाजासाठी त्यांचं योगदान हे राजकारणापलिकडचं आहे. त्यांनी आपल्या विचारांनी, भाषणांनी आणि दूरदृष्टीनं लाखो लोकांना प्रेरित केलं.
बाळासाहेब ठाकरे हे केवळ नेते नव्हते तर असंख्य लोकांसाठी पित्यासमान आहेत. नागरिकांच्या कल्याणासाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी ते कटिबद्ध होते. देशाच्या प्रगतीसाठी सध्याच्या आणि भविष्यातील पिढ्यांसाठी त्यांचा वारसा कायम प्रेरणा देत राहील. म्हणान भारतरत्न किताबानं त्यांना सन्मानित करुन त्यांच्या सामाजिक-राजकीय आणि सांस्कृतीक धाग्याची ओळख जगाला करुन द्यावी यासाठी त्यांना यंदा मरणोत्तर भारतरत्न जाहीर करण्यात यावा, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, अमित शाह आणि नरेंद्र मोदींना माझं आव्हान आहे की त्यांनी ढोंग बंद करावं आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा भारतरत्न देऊन गौरव करा. मागील काही काळात मोदी-शाह आल्यापासून राजकीय स्वार्थासाठी नियम डावलून भारतरत्न दिला जात आहे. पण ज्यांनी या देशात हिंदुत्त्वाचं बिज रोवलं आणि वाढवलं त्या बाळासाहेब ठाकरेंना अजून भारतरत्न का दिला नाही? 2026 ला बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होणार आहे, त्याआधी त्यांना भारतरत्न देणं गरजेचं आहे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.