Mumbai News : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेता नसतानाही महायुती सरकार अनेकदा अडचणीत आल्याचं दिसून येत आहे.तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे असलेल्या अर्थखात्याच्या निधीवाटपावरुन शिवसेनेच्या मंत्र्यांसह भाजप आमदारांकडून गंभीर आरोप केले जात असतानाच दुसरीकडे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनीही अधिवेशनात सभागृह दणाणून सोडत राजकारण तापवलं. तसेच जाधव यांनी निधी वाटपाचा मुद्दा उपस्थित करत अजितदादांनाच धारेवर धरले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे फायरब्रँड नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी सोमवारी (ता.7 जुलै) निधीवाटपाचा उचलून धरत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. यावेळी त्यांनी अजितदादांना उद्देशून कोणी एकानं चालवणारं हे खातं नाही, असा कोकणी बाणा दाखवत टीकेची तोफ डागली.
भास्कर जाधव म्हणाले, भाजपवाले अर्थखात्याबद्दल तक्रारी करत आहेत, शिवसेनावाले तर आधीपासूनच तक्रारी करत होते,असा अर्थसंकल्प नसतो. राज्याच्या तिजोरीवर कर्ज होतंय,ज्यानं कर्ज काढलेलं नाही, त्याच्या डोक्यावर कर्ज होत आहे. बोलून बोलून काय कराल,निधी देणार नाही, अरे तो तसाही तुम्ही देत नाहीत, असा घणाघात करत जाधवांनी थेट अजित पवारांनाच टार्गेट केलं.
अजितदादा अर्थमंत्री आहेत, मला त्यांचा आदर असल्याचं सांगत भास्कर जाधवांनी निधीवाटपावरुन होत असलेली घालमेल सभागृहात बोलून दाखवली. ते म्हणाले, अजित पवार (Ajit Pawar) संगमेश्वरला आले असताना त्यांच्याकडे गुहागर येथे छत्रपतींचा पुतळा उभारण्यासाठी 10 कोटींचा निधी मागितला होता. मात्र, त्यांनी साधा होकारही दिला नसल्याचा आरोप केला.
जाधव म्हणाले, सध्या जीएसटीवर तुमचं सर्व सुरु असून तो नसेल तर काय होईल. 7 लाख 75 हजार कोटींचा अर्थसंकल्प 8 लाख 15 हजारांवर नेत, 1 लाख रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प सादर केला गेला, असंही त्यांनी आपल्या सभागृहातील भाषणात म्हटलं.
यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी भाजपचे मंत्री नितेश राणेंनाही सोडलं नाही.ते म्हणाले,तुम्ही लोकांना शिव्या देता,त्यातून मुख्यमंत्र्यांची शाबासकी मिळवता.पण त्याऐवजी ड्रेझरसाठी हट्ट करा असा टोलाही त्यांनी लगावला.तसेच बाहेर जाऊन तुम्ही मला शिव्या द्याल,काही हरकत नाही. माझ्यासमोरच ही लहानाची मोठी झाली आहेत, आता काय ती मोठीच झाले असल्याचं म्हणत राणेंना डिवचलं.
माझ्या घरावर पेट्रोल बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोपही उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी यावेळी केला. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी माझी साधी विचारपूसही केली नाही. माझी गाडी शिवसेनाभवनाबाहेर फूटपाथवर उभी असताना तिची काच फोडली. याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं,पण त्याचं साधं उत्तरही देण्यात आलं नाही.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे आमदार भास्कर जाधव हे विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रचंड आग्रही असून त्यांना सातत्यानं वेटिंगवर ठेवण्यात येत असल्यानेच ते गेल्या काही दिवसापासून नाराजही आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.