मुंबई : राज्याच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये (Budget session) भाजप (BJP) नेते आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगतांना दिसत आहे. अधिवेशनाला एक दिवस बाकी असताना आज (ता. 24 मार्च) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विधानसभेत (Vidhansabha) भाषण केले. त्यांच्या भाषणानंतर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर खोचक शब्दांमध्ये टीका केली. यावेळी फडणवीसांनी विं.दा. करंदीकरांच्या कवितेतील काही ओळी सभागृहात ओळी वाचून दाखवत महाविकास आघाडी सरकार व ठाकरेंवर जोरदार टीका केली.
आज सभागृहात मुख्यमंत्री ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामांविषयी, राबवलेल्या उपाययोजनांबद्दल आणि घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांबद्दल माहिती दिली. त्यांच्या भाषणानंतर फडणवीसांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्र्याच्या भाषणावर खोचक टोला लगावला. फडणवीस म्हणाले, आज आनंदाची गोष्ट आहे की, छोटे का होईना, पण मुख्यमंत्र्यांचे भाषण सभागृहात ऐकायला मिळाले. त्यांनी चांगले काम करत असल्याचं सांगितले. मात्र, कदाचित ते विसरले असतील की, ५० हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना मदत द्यायची होती वगैरे आश्वासने होती. मात्र, त्यांचे आज भाषण ऐकायला मिळाले याचा आनंद आहे, अशा शब्दात फडणवीसांनी मुख्यमंत्र्याच्या भाषणाची खिल्ली उडवली.
फडणवीस म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकारला लोकांबाबत काही देणंघेणं नाही. केवळ टीका, आरोप, टोमणे यापलीकडे सरकारकडून काहीच काम केल जात नाही, यावर त्यांनी सभागृहात विं.दा. करंदीकरांच्या कवितेतल्या काही ओळीच वाचून दाखवल्या आणि सरकारवर चौफेर फटकेबाजी केली.
सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते.. तेच ते…
माकडछाप दंतमंजन,
तोच चहा तेच रंजन
तीच गाणी तेच तराणे,
तेच मूर्ख तेच शहाणे
सकाळपासुन रात्रीपर्यंत
तेच ते तेच ते
खानावळीही बदलून पाहिल्या
कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं.
काकू पासून ताजमहाल,
सगळीकडे सारखेच हाल
नरम मसाला, गरम मसाला,
तोच तो भाजीपाला
तीच ती खवट चटणी,
तेच ते आंबट सार
सुख थोडे दु:ख फार, अशी कवितेच्या ओळी वाचुन दाखवत फडणवीसांनी सरकारवर तोंडसुख घेतले. यानंतर त्यांनी ठाकरेंच्या भाषणातील एक संदर्भ सांगत त्यावरून ठाकरेंना टोलाही लगावला. फडणवीस म्हणाले, आमचे मुख्यमंत्री म्हणतात, की प्रश्न विचारायला अक्कल थोडी लागते. आम्हाला माहितीच नव्हते. आम्ही उगीच तारांकित-अतारांकित प्रश्न विचारत राहिलो. आधीच हे समजलं असते तर, नसते विचारले. काहींना संसदेत अधिक प्रश्न विचारल्याबद्दल संसदरत्न पुरस्कार मिळतो. मात्र आम्हाला आज समजले की, प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही, अश्या शब्दात फडणवीसांनी मुख्यमंत्री ठाकरेंना डिवचले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.