

Mumbai News: राज्यभरात पावसानं अक्षरश: धुमाकुळ घातला आहे. हवामान विभागानं अनेक जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. राजधानी मुंबईलाही पावसानं झोडपलं आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्याचं समोर आलं होतं. यात झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा तर मॅनहोलमध्ये पडून वयोवृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या दोन दुर्घटनांनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापलं आहे. राज ठाकरेंच्या टीकेला आमदार अमित साटम यांनी खोचक प्रत्युत्तर दिले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप आमदार व मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी विधानसभेत जयंत पाटलांशी बोलताना केलेल्या वक्तव्यावरून मोठा राजकीय वादंग निर्माण झाला आहे. त्याची गंभीर दखल घेत ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खरमरीत पत्र लिहिताना साटम यांच्यावर तीव्र संताप व्यक्त करतानाच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या संपूर्ण प्रकरणावर आता अमित साटम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अमित साटम म्हणाले, आशय बदलून विपर्यास करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करत आहेत. घरात बसून पोस्ट लिहितात त्यांना उत्तर देण्याची आवश्यकता वाटत नाही. आजपर्यंत अशाप्रकराच्या मुंबईत घटना घडल्यावर निलंबन झालं नव्हतं. मी विधानसभेत आवाज उचलला आणि पालिकेचे अधिकारी निलंबित झाले आहेत. त्यामुळे आम्ही फिल्डवर उभे आहोत. घरात बसून पोस्ट किंवा स्टेटमेंट लिहित नाहीत असं खोचक प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे.
तसेच विरोधक माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून लक्ष भरकटवत आहेत. आम्ही घरात बसून पोस्ट लिहीत नाही, तर रस्त्यावर उतरून काम करतोय असा सणसणीत टोलाही भाजप आमदार अमित साटम यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना लगावला. याचवेळी त्यांनी विधानसभेत आवाज उठवून आम्ही 2 दिवसांत 7 मनपा अधिकाऱ्यांचं निलंबन करून दाखवले! पावसात कधी उद्धव, आदित्य किंवा राज ठाकरेंना मुंबईकरांनी रस्त्यावर पाहिले आहे का?… असा सवालही साटम यांनी यावेळी उपस्थित केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपला खडेबोल सुनावले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे. हे पूर्व , पश्चिम , उत्तर , दक्षिण भारतातील लोकं सर्रास बोलत आहेत. केंद्रातील लोकं वाट्टेल तसे वागत आहेत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच. पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे ? आणि तुम्ही तो पसरू देताय? असं म्हणत, अशी अतिशय संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
तसेच त्यांनी तुमचा एक आमदार आणि पदाधिकारी लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नसल्याचं म्हणत टीकेची झोड उठवली आहे. यावेळी त्यांनी एक फार प्रसिद्ध वाक्य आहे जे तुम्ही पण कधी ऐकलं असेल, 'Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely' पण या वाक्याचा अर्थ उद्या समजून सांगायची वेळ आली तर सध्याचे भारतीय जनता पक्षाचे तुमचे सहकारी हे आदर्श उदाहरण ठरतील अशी परिस्थिती आहे. कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही यामुळे सगळे बेफाम झाले असल्याचा टोलाही लगावला आहे.
राज ठाकरे म्हणतात, देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील आहेत असं महाराष्ट्राला वाटत होतं, आणि मलाही वाटत होतं. पण हे असले प्रकार जेंव्हा होतात आणि त्यावर जेंव्हा काहीही खेद तुमच्या कडून व्यक्त केला जात नाही, तेंव्हा मात्र तुमच्या संवेनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते. खरंतर असं बेफाम वागणाऱ्यांकडून तुम्ही राजीनामे घ्यायला हवेत. पण तुम्ही ते का करत नाही आहात माहित नाही. वेडंवाकडं वागणाऱ्यांना फडणवीस जबर शासन करतात हे एकदा दाखवून द्या म्हणजे सगळेच सुतासारखे सरळ येतील. तुम्ही सुज्ञ आहात. तुमच्याकडून अपेक्षा असल्याचंही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सोशल मीडियावर विधानभवनातला एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत भाजप आमदार अमित साटम हे विधिमंडळाच्या पायऱ्यांजवळ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्याशी हास्यविनोद करताना दिसून येत आहे. त्यात साटम हे त्यांच्याशी “काल झाडावर होतं, आज मॅनहोल झालं…”, असं म्हणत खळखळून हसत असल्याचं पाहायला मिळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.