
Mumbai, 07 February : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आता फोडाफोडी करून काय करायचं आहे. शिंदेंना आता आपलेच आमदार सांभाळणे चॅलेंज राहणार आहे. कारण भारतीय जनता पक्षच त्यांच्या मित्रपक्षांतच फोडाफोडी करते. नितीशकुमार यांच्या पक्षात भाजपने तसं केलेले आहे. सगळीकडे भाजपवाले फिल्डिंग लावून बसलेले आहेत. आता ते शिंदेंच्या आमदारांसाठीही फिल्डिंग लावू शकतात, त्यांचा काही भरोसा नाही, असे सांगून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपचा मित्रपक्षांसोबतचा इतिहासच मांडला.
मुंबईत माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी हा दावा केला आहे. ते म्हणाले, शिवसेनेचे एवढे खासदार, तेवढे आमदार फुटणार असे गेली महिनाभरापासून नुसते आकडे सांगितले जात आहेत. काहीही नसताना ही अवास्तव बडबड केली जात आहे. आताच्या घडीला एकनाथ शिंदे यांनाच राज्यात कोणी विचारत नाही. भरत गोगावले यांच्या जागी एसटी महामंडळाचे अध्यक्ष संजय सेठ या अधिकाऱ्याला केले आहे.
एसटी महामंडळाच्या अध्यक्ष नियुक्तीवेळी किमान त्या खात्याच्या मंत्र्यांना (परिवहन मंत्री प्रताप सरनाईक) तरी माहिती पाहिजे. असे सरकार असताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तरी फोडाफोडीच्या भानगडी का करतील, असा माझा सवाल आहे. त्यामुळे शिवसेना खासदार फुटीच्या या बातम्या वावड्या आहेत. कार्यकर्ते इकडं तिकडं करू शकतात. पण खासदारांबाबतच अशा अफवा पसरविणे चुकीचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
दानवे म्हणाले, ऑपरेशन टायगर असं कुठं नाहीच. हे मीडियाने पसरवलेले ऑपरेशन टायगर आहे. असं कोणत्याही नेत्यानं म्हटलेलं नाही. उदय सामंतांनी लोक येतील असे म्हटलं आहे. त्यामुळे हे ऑपरेश टायगर वगैरे काही नाही. मुख्यमंत्र्यांना सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावे लागणार आहेत. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाबाबतचा निर्णय हा जसं पेरलं तसंच उगवलं आहे. फडणवीसांनी एसटीच्या अध्यक्षपदाबाबत केलं असेल. पण, शिंदेंनी फडणवीस गृहमंत्री असताना त्यांचं किती ऐकलं. आमच्याकडे पुरावे आहेत. फडणवीसांकडून आलेल्या याद्यांमध्ये किती फेरबदल केले. त्याच्या याद्याच आमच्याकडे आहेत.
निवडणूक आयोगावर राजकीय पक्षांचा नव्हे; तर सर्वसामान्य जनतेचाही विश्वास राहिलेला नाही. दिल्लीतील जनतेची तीच भावना झालेली आहे. मी दिलेलं मतदान संबंधित उमेदवाराला पडणार नसेल तर कशाला मतदान करायचे, अशी मतदारांची मानसिकता झाली तर आश्चर्य वाटायला नको, असेही दानवे यांनी म्हटले आहे.
लाडकी बहिण योजना ही निवडणुकीसाठी सुरू केलेली आहे, हे आम्ही तेव्हा सांगत होतो. ते प्रलोभन आणि लाच आहे. त्या वेळी सरसकट मंजूर केले, आता का ते सरसकट ठेवत नाहीत. निवडणुकीच्या अगोदर का नियम आणि अटी सांगितले नाहीत. ही निवडणुकीसाठी सुरू केलेली योजना होती. लाडकी बहीण म्हणून राज्यातील महिलांचं मतदान घेतलं आणि त्यांची फसवणूक करणारे लाडके भाऊ आता राज्याच्या सत्तेत आहेत, असा टोलाही अंबादास दानवेंनी सत्ताधाऱ्यांना लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.