BMC Election 2025: काहीही झालं तरी मुंबईतल्या 'त्या' जागांवर शिवसेना ठाम! भाजपसोबत वादाची शक्यता; कितीवर केला दावा? जाणून घ्या
BMC Election 2025: मुंबई महापालिका जिंकणं हे भाजपचं बऱ्याच मोठ्या काळपासूनच स्वप्न आहे. गेल्या निवडणुकीत भाजप ही महापालिका जिंकण्याच्या अगदीच जवळ पोहोचली होती, पण तत्कालीन उद्धव ठाकरेंच्या अखंड शिवसेनेनं त्यांना रोखलं होतं. भाजपनंही राज्यात शिवसेनेसोबत युती असल्यानं पालिकेसाठी तोडफोडीचं राजकारण न करता माघार घेतली होती. पण आता ती अखंड शिवसेना राहिलेली नाही.
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील सेना सध्या भाजपसोबत राज्यात महायुती म्हणून सत्तेत आहे. हीच महायुती म्हणून ते मुंबई महापालिका देखील लढवणार आहेत. पण गेल्यावेळच्या जागांसह आणखी २५ जागांवर शिवसेना ठाम असल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडं भाजपनं देखील शंभरपेक्षा अधिक जागा लढवणाऱ्या चंगच बांधला आहे. त्यामुळं इथल्या प्रभागांवरुन आता महायुतीतील या दोन पक्षांमध्ये चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
शिवसेना ९१ जागांवर ठाम पण...
गेल्या महापालिका निवडणुकीत अर्थात २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेनं २२७ प्रभागांपैकी ८४ जागा जिंकल्या होत्या. तर भाजपला ८२ जागा, तर मनसेला ७ जागा मिळाल्या होत्या. उरलेल्या ५५ जागा इतर पक्षांना मिळाल्या होत्या. निकाल स्पष्ट झाल्यानंतर मनसेच्या सर्वच्या सर्व ७ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळं शिवसेनेचं संख्याबळ हे ८४वरुन थेट ९१वर पोहोचलं होतं.
त्यामुळं यंदाच्या निवडणुकीतही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं हेच ९१ प्रभाग काहीही झालं तरी आपल्याकडंच ठेवण्यावर ठाम आहे. त्याचबरोबर इतरही २० ते २५ जागांवर शिवसेना आपले उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळं १२६ जागा शिवसेना लढवण्यावर ठाम असल्याची चर्चा आहे. पण असं जर झालं तर भाजपला केवळ १०१ जागांवरच समाधान मानावं लागेल. असं जर झालं तर भाजपला मुंबई महापालिका काबिज करण्याचं आणि तिथं भाजपचा महापौर बसवण्याचं स्वप्न केवळ स्वप्नच राहू शकतं. त्यामुळं
शिवसेनेच्या आमदारांवर मोठी जबाबदारी
शिवसेनेच्या मूळ ९१ जागा आणि वरच्या २५ जागांसाठी भाजप शिवसेनाला विरोध करु शकतो. यांपैकी काही जागा या आपल्या पारड्यात पाडून घेण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. दुसरीकडं एकनाथ शिंदेंनी देखील मुंबई महापालिकेसाठी चांगलीच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक माजी नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश दिला जात आहे. त्याचबरोबर मुंबईतील शिवसेनेच्या आमदारांसह काही माजी आमदारांवर आणि नेत्यांवर त्यांनी महापालिका यशस्वी करण्याची जबाबदारी सोपवली आहे.
२०१७ च्या निवडणुकीचं बलाबल
शिवसेना - 84
भाजपा - 82
मनसे - 7
काँग्रेस - 31
राष्ट्रवादी काँग्रेस - 9
समाजवादी पार्टी - 6
अपक्ष - 5
एमआयएम - 2
अभासे - 1
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.