

Mumbai News: मुंबई महानगरपालिकेतील (BMC) अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी राजकीय नेत्यांकडून थेट शिफारशी केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेतील तब्बल २२५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नावांसमोर थेट मंत्री, खासदार, आमदार आणि नगरसेवकांची नावे नमूद करण्यात आली आहेत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा सर्वाधिक उल्लेख आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी शहर अभियंता कार्यालयाकडे बदल्यांबाबतची माहिती मागवली होती. प्रशासनाने दिलेल्या सविस्तर यादीचे प्राथमिक विश्लेषण केले असता, महापालिकेतील Assistant Engineer (AE), Sub Engineer (SE), Executive Engineer (EE) आणि Junior Engineer (JE) या अभियांत्रिकी विभागातील वरिष्ठ पदांवरील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी राजकीय दबाव आणि शिफारशींचा वापर झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
यादीतील राजकीय नेत्यांच्या नावांच्या विश्लेषणात खालील प्रमुख नेत्यांची नावे वारंवार आढळून आली आहेत
*एकनाथ शिंदे: सर्वाधिक १० वेळा उल्लेख
* रामदास आठवले: ९ वेळा उल्लेख
* गिरीश महाजन व कालिदास कोळंबकर:प्रत्येकी ७ वेळा उल्लेख
* मंगेश कुडाळकर, अण्णा बनसोडे व तुकाराम काते: प्रत्येकी ६ वेळा उल्लेख
*मुरजी पटेल व दिलीप लांडे: प्रत्येकी ५ वेळा उल्लेख
*नरहरी झिरवळ, सुमीत वानखेडे, राहुल शेवाळे, प्रकाश सुर्वे, इंद्रनील नाईक, संतोष बांगर, राम कदम, किसन कथोरे व बच्चू कडू: प्रत्येकी ४ वेळा उल्लेख
*चंद्रशेखर बावनकुळे, हसन मुश्रीफ, भरतशेठ गोगावले, उदय सामंत, परिणय फुके, रवींद्र वायकर, प्रसाद लाड, सुनील प्रभू, महेश सावंत व प्रवीण दरेकर: प्रत्येकी ३ वेळा उल्लेख
याशिवाय प्रतापराव जाधव, पंकजा मुंडे, मंगल प्रभात लोढा, रावसाहेब दानवे, संजय घाडी, राहुल नार्वेकर, जयकुमार गोरे, सना मलिक, रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील आणि संजय बनसोडे यांच्याही नावांचा या शिफारस यादीत समावेश आहे.
यादीत नमूद असलेल्या काही प्रमुख नोंदींनुसार—रवींद्र घाटगे (संतोष बांगर), सुनील शेठे (प्रकाश सुर्वे, परिणय फुके), दीपक नागासोगे (मुरजी पटेल), प्रशांत जगताप (इंद्रनील नाईक, हसन मुश्रीफ), निलेश परब (मनिषा चौधरी, गिरीश महाजन), नेहा नितीन सांखे (उदय सामंत), प्रसाद धुमाळे (रवींद्र वायकर), अभय सांख्ये (चंद्रशेखर बावनकुळे) आणि उस्मान सादिक (सना मलिक) यांसारख्या अनेक अधिकाऱ्यांच्या नावासमोर राजकीय नेत्यांचे संदर्भ देण्यात आले आहेत.
"महापालिकेतील बदल्या या प्रशासकीय गरज, सेवाज्येष्ठता आणि पारदर्शक निकषांच्या आधारे होणे अपेक्षित आहे. मात्र, राजकीय लोकप्रतिनिधींची नावे असलेली ही यादी अत्यंत गंभीर आहे. अस्तित्वात असलेल्या प्रशासकीय नियमांचा भंग करून राजकीय दबाव आणणाऱ्या अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर महापालिका आयुक्तांनी तात्काळ शिस्तभंगाची कारवाई केली पाहिजे," असे अनिल गलगली यांनी म्हटलं आहे.
प्रशासकीय पारदर्शकतेचा दावा करणाऱ्या मुंबई महापालिकेत आता या राजकीय शिफारशींच्या प्रकरणामुळे खळबळ उडाली असून, आयुक्त यावर काय पाऊल उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.