

Devendra Fadnavis: अशोक खरात प्रकरणामुळं राज्यात खळबळ माजलेली असताना बुवाबाजी आणि अंधश्रद्धेपोटी नागरिकांची सुरक्षा धोक्यात आलेली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धा-अंधश्रद्धेवरुन विधानसभेतून जनतेचे कान टोचले आहेत. जनतेनं अशा प्रकारे कुठल्याही जाळ्यात अडकू नये असं आवाहन केलं आहे. यासाठी त्यांनी उदाहरण देताना पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांना आपण इथं बसल्या बसल्या टाचण्या टोचल्या असत्या असं मुख्यंमत्र्यांनी म्हटलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली.
मुख्यमंत्री म्हणाले, "जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, 'जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे तो आपुले, देव तेथेची जाणावा, तोची साधू ओळखवावा' त्यामुळं खऱ्या अर्थानं देवत्व कुठे बघितलं पाहिजे याचाही विचार करण्याची वेळ आता आपल्यावर आली आहे. संत एकनाथ महाराजांनीही म्हटलं की, 'एरा जनार्दनी काया वाचा, राम जपा. सोपे हे साधन तेढे नव्हे पुण्य पाला' म्हणजेच बाहेरच्या क्रीडा कांडांपैकी मनामध्ये राम जपा हे सर्वात सोपं साधन आहे. अशा पद्धतीनं आपल्याला संदेश दिला आहे. संत सेवालाल महाराजांनी सोप्या शब्दांत आपल्याला शिकवण दिली आहे की, 'आधी जाणून पाहा, मग तपासून पाहा, मगच माना'. आजच्या परिस्थितीत हे काय प्रकरण या ठिकाणी आहे त्यावर हीच संतांची शिकवण आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. म्हणून या प्रकरणातून निश्चितपणे सरकार म्हणून, समाज म्हणून आपल्या प्रत्येकाला शिकायला मिळेल. उद्या राम नवमी आहे यातून प्रभू श्रीरामाच्या चरणी हीच प्रार्थना आहे की आपला महाराष्ट्र धर्म वाढला पाहिजे पण भोंदूगिरीला कुठेही स्थान मिळता कामा नये.
दरम्यान, जादूटोणाविरोधीत कायद्याचे नियम अद्याप झालेले नाहीत हा विषय इथं उपस्थित झाला आहे. हे खरं आहे, पण याचे नियम अंतिम टप्प्यात असून कायदा आणि न्यायव्यवस्थेनं त्याला मान्यता दिली आहे. पण नियम नसले तरी सेक्शन ३ सक्रीय असल्यानं नियमाचा त्यात अडसर येत नाही. पण या कायद्याची अंमलबजावणी आपण ताकदीनं केलेली आहे. ही प्रकरणात आपण या कायद्याची अंमलबजावणी केली आहे. आपल्याला माहिती आहे की, जर जादूटोणा करुन जर समस्या संपल्या असत्या तर या भोंदू खरातला आपण ट्रम्पचा सुरक्षा सल्लागार म्हणूनच नेमला असता. त्यामुळं मग युद्ध आपण ड्रोनऐवजी लिंबू-मिर्चीनं लढली असतं. मग पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना इथं बसूनच आपण टाचण्यांनी संपूण टाकलं असतं, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
मग सीमेवर सैनिक पाठवण्याची आवश्यकता पडली नसती पाच-दहा भोंदूबाबा पाठवले असते आणि आपली सीमा नीट झाली असती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला प्रचारसभाच घ्याव्या लागल्या नसत्या. एकाच ठिकाणी बसून या निवडणुका जिंकता आल्या असत्या. मला असं वाटतं की आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण ज्याला आध्यात्म म्हणतो सकारात्मकता, प्रामाणिकता आणि दुसऱ्याचं ज्यात अहित होत ती कधीच श्रद्धा असू शकत नाही, ती अंधश्रद्धा आहे. याविरुद्ध निश्चितपणे मोठ्या कडक पद्धतीनं राज्य सरकार कारवाई करेल. मी काल आपल्याला निवदेन केलं त्यानंतरही माहिती खूप आली आहे. त्यात अजून प्रॉपर्टीचे डिटेल्स निघताहेत, वेगवेगळे कांड बाहेर निघत आहेत. या सुरस आणि चमत्कारीक कथा आहेत त्या पुढचे काही दिवस संपूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत बाहेर येत राहतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या सुरु असलेल्या श्रद्धा-अंधश्रद्धेच्या मुद्द्यावर भाष्य केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.