

Malegaon, 29 June : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कामकाजात प्रथमच माजी सनदी अधिकारी लक्ष घालणार आहेत. उपमुख्यमंत्री आणि साखर कारखान्याच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या अध्यतेखालील बैठकीत निवृत्त साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या कारखान्याच्या कामकाजात मार्गदर्शनाची जबाबदारी देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गायकवाड आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कामकाजातही लक्ष देणार आहेत.
साखर कारखान्याच्या प्रशासनात अधिक पारदर्शकता, कार्यक्षम व्यवस्थापन आणि कारखान्याच्या वैभवात भर घालण्याच्या उद्देशाने गायकवाड यांच्याकडे मार्गदर्शनाची जबाबदारी देण्याचा निर्णय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या धोरणात्मक निर्णयाला एकमताने मंजुरी देण्यात आली. बैठकीला उपाध्यक्ष संगीता कोकरे, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, तानाजी कोकरे, योगेश जगताप यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते.
साखर आयुक्त म्हणून शेखर गायकवाड यांनी साखर उद्योगात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांचा प्रदीर्घ अनुभव माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या प्रगतीसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल. कारखान्याची कार्यपद्धती अधिक पारदर्शक होऊन सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळावा, हा या निर्णयामागील प्रमुख हेतू आहे, असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या.
माळेगाव कारखान्याने ऊस लागवडीला चालना देण्यासाठी आणि शेतीपूरक उपक्रमांना बळ देण्यासाठी सभासद शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिटन २०० रुपयांचे कांडे पेमेंट वर्ग केले आहे. या निर्णयामुळे सभासद शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कारखान्याच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, उपाध्यक्षा संगीता कोकरे आणि संचालक मंडळाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
माळेगाव साखर कारखान्याने एकीकडे अनुभवी प्रशासकीय नेतृत्वाचा लाभ घेण्याचा निर्णय घेतला असताना, दुसरीकडे शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट आर्थिक मदत जमा करून सभासदकेंद्रित धोरणाला प्राधान्य दिले आहे, त्यामुळे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यपद्धतीला नवी दिशा मिळणार असल्याची चर्चा सभासदांमध्ये सुरू आहे.
या वेळी माजी सभापती अविनाश गोफणे, संजय जगताप, शेतकरी संघटनेचे सुखदेव जाधव, सदाशिव ढवळे, माऊली कदम, फरतडे आदी शेतकऱ्यांनी कारखान्याच्या शेतकरीहिताच्या निर्णयांचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.