मुंबई : राज्यातील २७१ ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने तब्बल ४० जागा जिंकल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या गटाचा उल्लेख शिवसेना (Shivsena) असा केला आहे, तर शिवसेनेचा उल्लेख उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray) असा केला आहे. पक्षांतराबाबतचा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू असताना मुख्यमंत्र्यांकडून स्वतःच्या गटाचा उल्लेख शिवसेना करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Chief Minister Eknath Shinde referred to his own group as Shiv Sena)
राज्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेपेक्षा जादा जागा जिंकल्याचा दावाही मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्विटमध्ये केला आहे. शिंदे यांनी केलेल्या ट्विटमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि मुख्यमंत्री यांचे फोटो लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेची निवडणूक निशाणी धनुष्यबाणही वापरण्यात आला आहे. त्यामध्ये कोणत्या पक्षाने किती ग्रामपंचायती जिंकल्या आहेत, याची आकडेवारी दिली आहे. त्यामध्ये भारतीय जनता पक्ष एक नंबरवर दाखविण्यात आला आहे. भाजपने सर्वाधिक ८२, शिवसेना म्हणजे शिंदे गटाने ४०, राष्ट्रवादी काँग्रेसने ५३, उद्धव ठाकरे २७, काँग्रेस २२ आणि इतरांनी ४७ ग्रामपंचायती जिंकल्याचा उल्लेख आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढे असेही म्हटले आहे की, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती सरकारला जनतेचा कौल. शिवसेना-भाजप युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन तसेच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना-भाजप युतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे तसेच मतदार राजाचे अभिनंदन आणि आभार... असे मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, पक्षांतर, शिवसेनेवरील वर्चस्वाचा वाद, धनुष्यबाण यांसदर्भातील वाद अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना मुख्यमंत्र्यांकडून स्वतःच्या गटाचा शिवसेना असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे यांनी पक्षावरील ताबा याबाबत सूचक टिप्पणी केल्याचे मानले जात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या ट्विटला शिवसेनेच्या उपनेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, हा राजकीय वाद आहे. याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात अपेक्षित आहे. याचं उत्तर काळच देईल. त्यावर मी जादा भाष्य करणार नाही. मात्र, सर्वोच्च न्यायालयात याचा फैसला होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.