
Mumbai News : महायुती सरकारमध्ये आधी मुख्यमंत्रिपदावरुन नंतर मंत्रिमंडळ विस्तार,खातेवाटप,मंत्रालयातील दालनं, बंगले यांच्यानंतर पालकमंत्रिपदावरुन नाराजीनाट्य रंगल्याचं दिसून आलं. विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक बहुमतानंतरही महायुतीत पाहायला मिळत असलेल्या नाराजीनाट्याची जोरदार चर्चा आहे. अशातच महायुतीचे कॅप्टन व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि नाराजीनाट्यावर मिश्किल टिप्पणी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता.23) संगीत-मानापमान या नाटकावर आधारित चित्रपटाच्या ट्रेलर लॉचिंगच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळी फडणवीसांनी आपल्या नेहमीच्या शैलीत तुफान शाब्दिक फटकेबाजी केली. ते म्हणाले,सुबोध भावे यांनी यापूर्वी बालगंधर्व आणि नंतर भामिनी यांची भूमिकाही साकारली,आता ते संगीत मानापमान नाटकातून धैर्यधरची महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.हासुध्दा एक योगायोग आहे.
याचाच संदर्भ देत फडणवीस राजकीय क्षेत्रावरही मिश्किल टिप्पणी केली.ते म्हणाले,राजकीय जीवनात आम्हालाही असं करावं लागतं. मुख्यमंत्री,कधी विरोधी पक्षनेता नंतर उपमुख्यमंत्री आणि मग पुन्हा मुख्यमंत्री व्हावं लागतं,असं म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ उडाला.
तसेच फडणवीस यांनी मी गेल्या दोन दिवसांमध्ये मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion),खातेवाटप, बंगले वाटप,ऑफिस वाटप करुन संगीत मानापमान चित्रपटाच्या या कार्यक्रमाला आलो आहे. खरंतर आमच्या राजकीय क्षेत्रामध्येही मानापमान होतो,पण तो मनात होतो. मात्र,त्याचं संगीत मीडियात वाजतं,अशी कोपरखळीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावली.
फडणवीस म्हणाले, मराठी भाषेला संगीत नाटकांची मोठी परंपरा लाभली आहे. याचवेळी त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचंही सांगितलं. पण आपलं संगीत आणि नाट्य संगीतही तितकंच अभिजात आहे. या सर्व परंपरा आपल्या नव्या पिढीसमोर येणं हेसुध्दा अत्यंत आवश्यक आहे, असं मतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भेटीवर भाष्य केलं. ते म्हणाले, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना राज्याच्या मंत्रिमंडळातून डावलण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोणताही हेतू नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार राष्ट्रीय पातळीवर करण्याची अजितदादांची इच्छा आहे, त्यासाठी इतर राज्यांतही मान्यता असलेल्या भुजबळ यांच्यासारख्या नेत्याच्या खांद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारी द्यायची होती, हे मला खुद्द अजित पवारांनी सांगितले होते, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांच्या नाराजीमागचे कारण स्पष्ट केले.
भुजबळ यांच्या नाराजीवर आम्ही सर्वजण मिळून निश्चितपणे तोडगा काढू. त्यांच्यासारखा एक नेता आमच्यासोबत मैदानात असला पाहिजे, या दृष्टीने या नाराजीनाट्यातून निश्चितपणे मार्ग काढला जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.