
Mumbai News : महाराष्ट्रात सध्या परभणी आणि बीड या दोन्ही घटनांमुळे रान पेटलं आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या घटनांमध्ये सखोल चौकशी करुन कोणालाही सोडणार नसल्याचे जाहीर केल्यानंतरही या प्रकरणांमुळे निर्माण झालेली संतापाची लाट आणखी तीव्र झाली आहे. अशातच आता महाविकास आघाडीतील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप करत मोठं पाऊल उचललं आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी(ता.25) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरोधात आम्ही हक्कभंग आणणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. महायुती सरकार धडाक्यात सत्तेत परतल्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री झाले.तर विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असलेला आकडा गाठण्यात अपयश आलेल्या महाविकास आघाडीनं आता फडणवीसांनाच टार्गेट केल्याचं दिसून येत आहे.
बीड आणि परभणी प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी विधानसभेची दिशाभूल करत पोलिस आणि आरोपींना वाचवण्याचं काम फडणवीसांनी केल्याचा गंभीर आरोप पटोले यांनी केला आहे. याचमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध आम्ही हक्कभंग आणणार असल्याचं पटोले यांनी जाहीर केलं आहे.
पटोले म्हणाले,संतोष देशमुख हत्या आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू अशा दोन्ही घटना आम्ही विधानसभेमध्ये लावून धरल्या.पण मुख्यमंत्र्यांकडून या दोन्ही घटनांबाबत ज्या पध्दतीने खोटारडेपणा केला,तो स्पष्ट झाला आहे.त्यामुळं आम्ही बीड आणि परभणी अशा घटनांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार असल्याचेही त्यांनी सांगितलं.
संतोष देशमुखच्या प्रकरणात आणि परभणी या दोन्ही घटनांमध्ये मुख्यमंत्र्यांचा खोटारडेपणा स्पष्ट झाला आहे. त्यामुळं आम्ही या दोन्ही घटनांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या विरोधात प्री व्हिलेज पोझिशन आणू असे पटोले यांनी सांगितलं. फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये 65 टक्के मंत्री हे गुन्हेगार प्रवृत्तीचे असल्याचा आरोपही काँग्रेसच्या नाना पटोले यांनी केला. महाराष्ट्रात गुन्हेगारांचे सरकार निर्माण झालेलं आहे का? असा सवालही उपस्थित केला असून राज्य सुरक्षित नसल्याचं खळबळजनक विधानही पटोले यांनी केलं आहे.
परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूबाबत बोलताना पटोले यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.ते म्हणाले,मुख्यमंत्री फडणवीस या प्रकरणी खोटं बोलले असून त्यांनी विधानसभेची दिशाभूल केली आहे.सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोस्टमार्टम केल्यानंतर त्या रिपोर्टचे पहिले पान सर्वांनी पाहिले आहे. त्यानुसार सूर्यवंशी यांना श्वसनाचा दुर्धर आजार असल्याचे फडणवीस म्हणाले होते.
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी काँग्रेस पूर्णपणे असणार आहे. ज्यांनी त्यांची हत्या केली आहे.त्या आरोपीला सोडणार नाही.त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असा प्रयत्न काँग्रेसच्या वतीने केला जाणार असल्याचंही पटोले यांनी सांगितलं.याचवेळी त्यांनी राहुल गांधी लोकसभेत सुद्धा भूमिका मांडतील आणि सरकारचं पितळ उघड करतील असे पटोले म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.