Mumbai Political News: लोकसभेची निवडणूक काही महिन्यांवर येवून ठेपली आहे, त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. काँग्रेसनेदेखील मोठ्या हालचाली सुरू केल्या असून, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे, तर या पूर्वीच महाराष्ट्र काँग्रेसने पक्षाच्या हायकमांडकडे काही नावे पाठवली होती. मात्र, ही नावे हायकमांडने फेटाळली असल्याचे बोलले जाते.
या पार्श्वभूमीवरच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तातडीने दिल्लीला गेले आहेत. पटोले यांचा पालघर दौरा नियोजित होता, पण त्यामध्ये अचानक बदल करत ते दिल्लीला रवाना झाले आहेत. ते काँग्रेस हायकमांडची भेट घेणार असून, या भेटीत राज्यातील घडामोडीची माहिती वरिष्ठांना देण्याची शक्यता आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील पक्ष संघटनेचा आढावा पटोले पक्षश्रेष्ठींना देणार असून, आगामी निवडणुकीसंदर्भात काँग्रेसची महाराष्ट्रात रणनीती कशी असावी, याबाबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राष्ट्रीय सरचिटणीस वेणुगोपाल हे प्रदेशाध्यक्ष पटोले यांना कानमंत्र देणार असल्याचे बोलले जाते.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्र मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले. राष्ट्रवादीचा गट सत्तेत सहभागी झाला, तर राष्ट्रवादीचा एक गट विरोधी पक्षात आहे. त्यामुळे याचा फटका महाराष्ट्रात महाविकास आघाडीला बसला.
आता काही महिन्यांवर लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्या दृष्ट्रीने काँग्रेसने आता पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता पक्षाचे हायकमांड प्रदेशाध्यक्ष पटोले यांना काय सूचना करतात, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
Edited by : Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.