Mumbai News: छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्य कॅबिनेटची आज बैठक झाली. त्यात मराठवाड्यासाठी ५९ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले. त्यावर समाधानी न झालेल्या काँग्रेसने हा 'बोलाचीच कढी आणि बाेलाचाच भात' असल्याचा हल्लाबोल केला. मराठवाड्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती असतानाही तेथे दुष्काळ जाहीर न केल्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला. ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा आहे, असे ते म्हणाले.
शिंदे-फडणवीस मुंबईप्रमाणे छत्रपती संभाजीनगरातही ‘बोलून झाले मोकळे’ आणि मराठवाड्यातील जनतेच्या हाती आले फक्त भोपळे, असा टोला पटोलेंनी लगावला. मराठवाड्यातील जनतेच्या समस्या मार्गी लागाव्यात, यासाठी शिंदे-फडणवीस-पवार सरकारने छत्रपती संभाजीनगरात मंत्रिमंडळ बैठक घेतली.
पण, त्यातून मराठवाड्याच्या जनतेला काहीही मिळालेले नाही. ५९ हजार कोटींच्या योजना दिल्याचा ढोल पिटला जात असला, तरी तो आकड्यांचा खेळ असून, प्रत्यक्षात जनतेच्या हाती जेव्हा काही लागेल तेेव्हाच ते कळेल, असेही ते म्हणाले.
राज्य सरकार दोन दिवस छत्रपती संभाजीनगरमध्ये जनतेचे कोट्यवधी रुपये खर्चून मौजमजा करून परतले. मराठवाड्यात काही हजार कोटींच्या योजना दिल्याचे जाहीर केले. पण, त्या प्रत्यक्षात कधी येतील हे सांगता येत नाही. संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या झळा सहन करत असून, खरीप वाया गेला आहे.
पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी वाढली आहे, जनावरांना चारा नाही, शेतकऱ्याला मोठ्या मदतीची गरज आहे, पण सरकारने त्याकडे लक्ष दिलेले दिसत नाही. सध्या मराठवाड्यातील जनतेला काय हवे, ते मात्र सरकारने दिलेले नाही, अशी खंत पटोलेंनी कॅबिनेटच्या या बैठकीनंतर व्यक्त केली.
कृषिमंत्र्यांच्या बीड जिल्ह्यातच १६८ शेतकऱ्यांनी मागील दीड-दोन महिन्यांत आत्महत्या केल्या आहेत. इतर जिल्ह्यात अशीच स्थिती आहे, पण सरकारने त्यावर काहीही उपाययोजना जाहीर केल्या नाहीत. खरीप वाया गेल्यातच जमा आहे, त्यासाठीही काही मदत जाहीर केली नाही.
मराठवाड्यातील तरुण नोकऱ्यांसाठी मुंबई-पुणेसारख्या शहरात स्थलांतर करत आहेत. त्यांच्या रोजगारासाठी राज्य सरकारने ठोस योजना जाहीर केलेली नाही हे मराठवाड्याचे दुर्दैव आहे, असे पटोले म्हणाले. छत्रपती संभाजीनगर येथील मंत्रिमंडळ बैठकीत “ते बोलून झाले मोकळे आणि मराठवाड्याच्या हाती फक्त भोपळे” असेच म्हणाले लागेल, अशी कोपरखळी पटोलेंनी मारली.
Edited by - Ganesh Thombare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.