Kalyan News: आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात महेश गायकवाड यांना सहा गोळ्या लागल्या होत्या. महेश गायकवाड हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. महेश गायकवाड यांंच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती सांगण्यात येत असतानाच त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकसित करण्यात येत असलेल्या जागेत बेकायदा घुसून नुकसान केल्याचा आरोप एका बांधकाम व्यावसायिकाने केला असून याप्रकरणी त्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे शुक्रवारी हिललाईन पोलिसांनी शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड, त्यांचे समर्थक आणि व्दारलीतील इतर ७० ग्रामस्थांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
या दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली होती, परंतु, गोळीबाराच्या घटनेनंतर रविवारी या दाखल गुन्ह्याचे प्रकरण बाहेर आले आहे.
कल्याण पश्चिमेतील बांधकाम व्यावसायिक जितेंद्र रामअवतार पारीख (३७) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. ते व्हर्टेक्स स्काय व्हिला या बांधकाम कंपनीचे संचालक आहेत. कल्याण पश्चिमेतील वायलेनगर भागात ही कंपनी आहे.
कल्याण पूर्वेतील भाजप आमदार गणपत गायकवाड या बांधकाम कंपनीशी संबंधित आहेत, असे समजते. या प्रकरणात शिवसेनेचे कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड, अक्षय दिनेश गायकवाड, राहुल पाटील, किरण फुलोरे, एकनाथ जाधव, सुनील जाधव आणि इतर ७० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींमध्ये तीन महिलांचा समावेश आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी केलेल्या गोळीबारात महेश गायकवाड यांना सहा गोळ्या लागल्या होत्या. महेश गायकवाड हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती.
यानंतर आता कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant shinde) यांनीही महेश गायकवाड यांची भेट घेत संवाद साधला आहे. श्रीकांत शिंदे यांचा महेश गायकवाड यांच्याशी संवाद साधतानाचा एक फोटो व्हायरल होत आहे. ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये महेश गायकवाड यांच्यावर उपचार सुरु आहेत.
(Edited By- sachin Waghmare)