Delhi Bomb Blast : 'गृहमंत्र्यांच्या नाकासमोर लाल किल्ला हादरवला, भाजपवाल्यांनो, भारतमातेचे खरे भक्त असाल तर अमित शहांचा राजीनामा मागा...'

Shivsena UBT On Delhi Bomb Blast : दिल्लीच्या रस्त्यावर किड्यामुंग्यांसारखी माणसे मारली जातत, सरकार बिहारातील निवडणुकांत दंग. दहशतवाद हा जागतिक चिंतेचा विषय आहे. भारतात तो राजकीय विषय बनला आहे. प्रत्येक दहशतवादी हल्ल्याचे राजकारण करायचे, हिंदू-मुसलमानांत तेढ निर्माण करून राजकीय भाकऱ्या शेकायच्या हेच उद्योग गेल्या 10 वर्षांत घडले.
Delhi Bomb Blast, Amit Shah
Rescue teams at the Delhi Red Fort blast site as authorities investigate the explosion that shook the capital. Delhi bomb blast highlights national security concerns.Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT On Delhi Bomb Blast : 'स्वतःला सरदार पटेल यांच्या रूपात पाहणारे अमित शहा हे आतापर्यंतचे सगळ्यात कमजोर आणि बकवास गृहमंत्री आहेत. त्यांच्या डोळ्यांसमोर 26 महिलांचे कुंकू पुसले जाते, त्यांच्या नाकासमोर स्फोट घडवून लाल किल्ला हादरवला जातो आणि गृहमंत्री त्यांचे पंचरंगी उपरणे खांद्यावर टाकून बैठकाच घेत आहेत.

दहशतवादाचा बीमोड करण्यात आणि राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देण्यात मोदी-शहांचे सरकार अपयशी ठरले आहे,' अशा शब्दात ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून मोदी-शहांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनजळ सोमवारी सायंकाळी झालेल्या स्फोटात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला.

याच बॉम्बस्फोटाच्या प्रकरणावरून ठाकरेंच्या शिवसेनेने मोदी-शहांवर सडकून टीका केली आहे. देशाचे गृहमंत्री शहा अपयशी ठरले असून त्यांच्या कार्यकाळत पुलवामा आणि आता दिल्ली मध्ये मोठ्या देशविरोधी कारवाया झाल्या आहेत. त्यामुळे आता त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सामनातून केली आहे.

सामनामध्ये लिहिलं की, दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरली आहे. ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी हे राष्ट्राला उद्देशून भाषण देतात, दहशतवादाचा बीमोड करण्याचे आश्वासन देतात, त्याच लाल किल्ला परिसरात दहशतवाद्यांनी बॉम्ब फोडले. दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरली असताना पंतप्रधान, गृहमंत्री यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ बिहार निवडणुकांच्या प्रचारात दंग होते.

दिल्लीच्या रस्त्यावर किड्यामुंग्यांसारखी माणसे मारली जात आहेत व सरकार बिहारातील निवडणुकांत दंग आहे. दहशतवाद हा जागतिक चिंतेचा विषय आहे. भारतात तो राजकीय विषय बनला आहे. प्रत्येक दहशतवादी हल्ल्याचे राजकारण करायचे, प्रत्येक हल्ल्याचा प्रचारात वापर करायचा, हिंदू-मुसलमानांत तेढ निर्माण करून राजकीय भाकऱ्या शेकायच्या हेच उद्योग गेल्या दहा वर्षांत घडले.

देशाची राजधानीच सुरक्षित नसेल तर या देशात काय सुरक्षित आहे? असा सवाल सामनात उपस्थित केला आहे. तर जम्मू-कश्मीरात भारतीय पर्यटक सुरक्षित नाहीत. मणिपूरसारख्या राज्यात जनता सुरक्षित नाही. राजधानी दिल्लीत कधीही, कोठेही बॉम्बस्फोट होऊ शकतो. पहलगाम येथे 26 पर्यटकांना मारण्यासाठी दहशतवादी घुसले व महिलांचे कुंकू पुसून निघून गेले तरी गृहखात्यास पत्ता लागला नाही.

Delhi Bomb Blast, Amit Shah
Sangli Crime : सांगली हादरली! आधी वाढदिवसाच्या शुभेच्छा,नंतर सपासप वार, राजकीय नेत्याचा 'मुळशी पॅटर्न' स्टाईलनं काढला काटा

भारतीय गृहखात्याची ‘इंटेलिजन्स’ यंत्रणा पूर्णपणे कोलमडून पडल्याचा हा पुरावा आहे. इतका मोठा हल्ला होतो व गुप्तचरांना माहिती मिळत नाही? गुप्तचर खात्याचे राजनीतीकरण झाले आहे. दहशतवाद्यांचा माग काढण्याऐवजी राजकीय विरोधकांचा माग काढण्यासाठीच गुप्तचर यंत्रणा बैलाप्रमाणे जुंपली आहे. पहलगाम हल्ल्यातील गुन्हेगार अद्याप सापडलेले नाहीत. पुलवामाचे गुन्हेगार मोकाट आहेत.

आता दिल्लीतील गुन्हेगार पळून गेले. सरकार हात चोळत बसले आहे. भारताचे सरकार हे आपल्याच नागरिकांचे बळी उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ केले. ‘आता पाकिस्तानवर तिरंगा फडकवून माघारी येऊ. पाकिस्तानला अशी अद्दल घडवू की, पुन्हा पाकडे उठणार नाहीत,’ अशा डरकाळ्या तेव्हा सत्ताधाऱ्यांनी फोडल्या होत्या, पण ट्रम्प यांनी व्यापार बंद करण्याची धमकी देताच ‘सिंदूर’ गुंडाळण्यात आले, असा टोलाही सामनातून लगावला आहे.

तर दिल्लीतील हा हल्ला कोणी केला, याचा शोध घेण्याचे काम आता सुरू आहे. पण तुमचे शोध तुमच्यापाशी ठेवा. दहशतवादी आणि त्यांच्या पाकडय़ा बापजाद्यांचे निर्मूलन आधी करा. दिल्लीतील स्फोटापूर्वी तीन राज्यांतील पोलीस कारवाईत 2900 किलो स्फोटके सापडली. दहशतवादी संघटनांशी संबंधित आठ-दहा लोकांना अटक केली तरीही दिल्लीत स्फोट व्हायचा तो झालाच. आता मुंबईसह प्रमुख शहरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सार्वजनिक ठिकाणी भयाच्या सावटाखाली कसाबसा जगतो आहे. दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ गजबजलेल्या चांदनी चौकात स्फोट होतो तेव्हा किमान शंभर जणांचे जीव संकटात येतात. पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतील स्फोटानंतर संवेदना वगैरे व्यक्त केल्या. गृहमंत्र्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला, पण निरपराध्यांचे प्राण वाचवण्याची जबाबदारी तुमचीच होती. तुम्ही बिहारच्या राजकारणात उखाळ्यापाखाळ्या काढण्यात दंग राहिलात आणि दहशतवाद्यांनी भारतात शिरकाव केल्याचा आरोपही सामनातून केला आहे.

Delhi Bomb Blast, Amit Shah
Maharashtra politics : सुप्रिया सुळेंचं CM फडणवीसांना पत्र; भाजपसह राणाजगजितसिंह पाटलांची कोंडी

देशावर दहशतवादी हल्ला झाल्याची बोंब ठोकली गेली, पण या दहशतवादी हल्ल्यास स्वतः पंतप्रधान व गृहमंत्री जबाबदार आहेत. त्यांना देश सांभाळता येत नाही. त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेचे काहीच पडलेले नाही. स्वतःला सरदार पटेल यांच्या रूपात पाहणारे अमित शहा हे आतापर्यंतचे सगळ्यात कमजोर आणि बकवास गृहमंत्री आहेत. त्यांच्या डोळ्यांसमोर 26 महिलांचे कुंकू पुसले जाते, त्यांच्या नाकासमोर स्फोट घडवून लाल किल्ला हादरवला जातो आणि गृहमंत्री त्यांचे पंचरंगी उपरणे खांद्यावर टाकून बैठकाच घेत आहेत.

दिल्लीच्या बॉम्बस्फोटाने राष्ट्रासमोर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दहशतवादाचा बीमोड करण्यात आणि राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देण्यात मोदी-शहांचे सरकार अपयशी ठरले आहे. त्यांनी राजीनामा दिला तर 140 कोटी जनतेवर उपकार ठरतील, नाहीतर कधी दिल्ली, कधी मुंबई, कधी बंगळुरूसारखी शहरे रक्ताने लथपथ होऊन तडफडताना दिसतील. भाजपवाल्यांनो, भारतमातेचे खरे भक्त असाल तर गृहमंत्री अमित शहांचा राजीनामा मागा. तीच देशसेवा ठरेल, अशा शब्दात दिल्ली बॉम्बस्फोटावरून ठाकरेंच्या शिवसेनेने मोदी-शहांवर निशाणा साधला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com