Pavsali Adhiveshan 2023: पावसाळी अधिवेशनात आज तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्यात जुंपली. प्रश्नोत्तरांच्या तासात दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी झाली. जाधवांच्या विधानावर फडणवीसांनी टोलेबाजी केली.
"हात वर केल्यानंतरही आपल्याला अध्यक्ष प्रश्न विचारू देत नाही," असा आरोप भास्कर जाधव यांनी सभागृहात केला. त्यावर फडणवीस यांनी "जाधव अनेकवेळा जास्त चिडतात. आपण जेव्हा चिडतो तेव्हा आपल्या तोंडून असे अनेक शब्द निघतात, भास्करराव… पण हे योग्य नाही,"
"फडणवीस, आपण माझ्या भावना समजू शकतात आणि आपल्यामध्ये जे वाक्यचातुर्य आहे, त्याला काही तोड नाही. हे आम्ही अनेक वर्षांपासून ओळखतोय. अध्यक्षांनी सांगितल्यानुसार मी बटण दाबलं कारण बोलायला संधी मिळेल. अध्यक्षांच्या लक्षात आणून देतो की, एकावेळेस आठ ते दहा लक्ष्यवेधी होत होत्या. लक्ष्यवेधी कोणत्या डिफिनेशनमध्ये बसते हे तुम्हाला आणि आम्हालाही माहिती आहे," याची आठवण जाधवांनी फडणवीसांनी करुन दिली.
"अध्यक्ष नार्वेकर यांच्याकडे मी अनेक वेळा जातो. चार ते सहा वेळेस जाऊन लक्षवेधीचे नियम आणि निकष याच्यामध्ये बसणाऱ्या लक्षवेधी कशा? अॅडमिट झालेल्या माझ्या दोन तरी लक्षवेधी लावा, यासाठी मी अनेकवेळा गेलो. वैयक्तिक त्यांचं आणि माझं काहीही वाकडं नाही. मी त्यांच्याकडे जातो आणि चहा पिऊन येतो. काही चुकीचं झालं तर मी त्यांच्या कानावर घालतो," असे जाधव म्हणाले. "..पण मला वाटतं तुम्ही काही खासगीत सांगून ठेवलंय का? काही ठेवलं असेल तर मला तुम्हीच घेऊन चला आणि विषय संपवून टाका," असे सांगत जाधवांनी फडणवीसांना डिवचलं.
जाधवांच्या या विधानावर फडणवीसांनी त्यांची फिरकी घेतली. फडणवीस म्हणाले, "आता माझ्या लक्ष्यात आलं, यामागील कारण काय? तुम्ही त्यांना केवळ चहा प्यायला देतात. त्यांना केक खायला देत नाहीये. तुम्ही त्यांना चहा ऐवजी गोड केक खाऊ घाला आणि त्यांचं म्हणणं समजून घ्या," असं देवेंद्र फडणवीस नार्वेकरांना म्हणाले. यावर सभागृहात हास्यांचे फवारे उडाले.
फडणवीस जाधवांना काय म्हणाले..
एकाच वेळी शंभर सदस्यांचे हात वर असतात. अनेक सदस्य प्रत्येक प्रश्नात हातवर करतात. त्यामुळे प्रत्येक वेळी सगळ्यांनाच बोलायला मिळेल, असं काही नाही. ज्यांचे प्रश्न असतात त्यांना प्राधान्य मिळतं. त्यामुळे भास्कर जाधवांना बोलू देऊ नये, असा कुणाचाही हेतू नाहीये. तसेच अशा प्रकारचा हेतू आरोप अध्यक्षांवर करणं देखील योग्य नाही. ते अनेकवेळा जास्त चिडतात. आपण जेव्हा चिडतो तेव्हा आपल्या तोंडून असे अनेक शब्द निघतात, भास्करराव… पण हे योग्य नाही...
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.