
Mumbai News : सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूगाव येथे सुरू असलेले कथित अवैध मुरूम उत्खनन रोखण्यासाठी आयपीएस महिला अधिकारी अंजना कृष्णा तिथे गेल्या होत्या. याचवेळीउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांचा फोनवर संवाद झाला. याच संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळातही त्याचे तीव्र पडसाद उमटले आहे. याच व्हिडिओ आणि अंजना कृष्णा प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) पहिलीच प्रतिक्रिया समोर आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंगळवारी (ता.9) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नमो सन्मान शेतकरी योजनेच्या हफ्त्यासह अनेक मुद्द्यांसह गाजत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील संवादाच्या व्हायरल व्हिडीओवर भाष्य केलं आहे.
फडणवीस म्हणाले, याप्रकरणी पोलिसांनी जी काही कायदेशीर कारवाई करायची आहे,ती केली आहे. या प्रकरणाचा पूर्ण रिपोर्ट अजून माझ्याकडे आलेला नाही. तो जिल्हाधिकाऱ्यांकडे मी मागणार आहे. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. अजितदादांनीही यासंदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे.
खूपवेळा समोरच्या बाजूला काय चाललं आहे,याची आपल्याला कल्पना नसते. आमच्याकडे निवेदनं येतात, त्यावर आम्ही कारवाई करा, असं लिहून देतो. मात्र,निवेदनातली वस्तुस्थिती आणि प्रत्यक्षातली वस्तुस्थिती यात खूप मोठी तफावत असते असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
यानंतर खरी वस्तुस्थिती अधिकारी आमच्या लक्षात आणून देतात. निवेदनात सांगितलेली वस्तुस्थिती योग्य नसून तेथील परिस्थिती वेगळी आहे, असंही अधिकाऱ्यांचं म्हणणं असतं. आणि त्याचआधारावर कामं होतात, असं फडणवीस यांनी यावेळी म्हटलं.
याबाबत अजित पवार (Ajit Pawar) दादांनीही स्वत: खुलासा केला आहे.आणि मीही जिल्हाधिकाऱ्यांकडे याप्रकरणी अहवाल मागितला आहे. त्यामुळे याप्रकरणी सध्यातरी एवढंसं पुरेसं आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.
अवैध मुरूम उत्खनन होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर माढा तालुक्यातील कुर्डू येथे कारवाईसाठी गेलेल्या आयपीएस अधिकारी अंजली कृष्णन यांच्याशी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फोनवरुन दादागिरीची भाषा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अजित पवारांवर मोठ्या प्रमाणावर टीका टिप्पण्या सुरु झाल्या. या प्रकरणाची खूपच चर्चा वाढल्यानंतर अखेर पवारांनी यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. थेट ट्विट करुन त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्याशी फोनवरुन झालेला संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यानंतर अजित पवारांवर मोठ्या प्रमाणावर टीका व्हायरला सुरुवात झाली. यानंतर अजित पवार यांनी यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली. यात म्हटलं की, "सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत.
मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता. आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर असल्याचंही अजितदादा यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.
माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे,असंही अजित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.
अवैध मुरूम उत्खननात हस्तक्षेप करणाऱ्या आयपीएस अधिकारी अंजली कृष्णन यांच्याशी स्थानिक ग्रामस्थ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत वाद झाला. यानंतर या कार्यकर्त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावला. अजित पवार फोनवर म्हणाले, "हे थांबवा आणि तहसीलदारांना जाऊन सांगा उपमुख्यमंत्र्यांचा फोन आला होता.
मुंबईतील वातावरण बिघडलं आहे, आपल्याला त्याला प्राधान्य द्यायचं आहे. यानंतर अजित पवारच बोलत आहेत की दुसरं कोणी आवाज बदलून बोलतंय याची खातरजमा करण्यासाठी आयपीएस कृष्णन यांनी पवारांना आपल्या फोनवर फोन करा, असं त्यांना सांगितलं. त्यानंतर अजित पवार भडकले आणि म्हणाले की, मी तुझ्यावर थेट अॅक्शन घेऊ शकतो. तु्झा नंबर दे, मी तुझ्या फोनवर व्हॉट्सअप कॉल करतो. माझा चेहरा तरी ओळखू येईल ना? एवढं डेअरिंग झालं"
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.