
Devendra Fadnavis bungalow : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काही दुरूस्तीची कामे केली जाणार आहे. त्याअंतर्गत डबल बेड मॅट्रेस, सोफा यासाठी 20.47 लाख रुपये तर किचन दुरुस्तीसाठी 19.53 लाख असा खर्च केला जात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
रोहित पवारांनी सोशल मीडियात याबाबत पोस्ट केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काढण्यात आलेल्या निविदेतील माहितीही त्यांनी या पोस्टमध्ये दिली आहे. त्याआधारे त्यांनी म्हटले आहे की, आज संपूर्ण राज्यात अतिवृष्टीने शेतकरी उध्वस्त झालेला आहे. सरकारकडे पैसे नसल्याने शेतकऱ्यांना मदत, कर्जमाफी दिली जात नाही. राज्यावरील कर्जाचा बोझा 9.5 लाख कोटींच्या वर गेला आहे.
असे असताना मुख्यमंत्र्यांच्या शासकीय घरी म्हणजेच वर्षा निवासस्थानी डबल बेड मॅट्रेस, सोफा यासाठी 20.47 लाख रुपये तर किचन दुरुस्तीसाठी 19.53 लाख असा एकूण 40 लाखाहून अधिक पैसा खर्च केला जात असेल तर यास जनतेच्या पैशाची उतमात म्हणावं की वाढलेली महागाई?, असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.
मुख्यमंत्री यांना कदाचित हे माहित नसेल, पण हे असंच चालू राहिलं तर ‘रोम जळत आहे आणि निरो बासरी वाजवत आहे’ असाच त्याचा अर्थ निघेल. मंत्र्यांच्या घरांच्या दुरुस्तीची कामं केली पाहिजेत पण केंव्हा आणि त्यासाठी किती खर्च करावा याचाही ताळमेळ असला पाहिजे ना, असेही रोहित पवारांनी म्हटले आहे.
आम आदमी पक्षाचे नेते विजय कुंभार यांनीही सोशल मीडियात याबाबत एक पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, माहिती घेतली तर 20.47 लाख रुपये केवळ एका बेडवर नव्हे तर 8 बेड, 4 डबल सीट सोफा सेट, 2 सिंगल सीट सोफा सेट, 15 खुर्चा आणि 6 टेबलवर खर्च केले जाणार आहेत. यात आक्षेप घेण्यासारखे मुद्दे नाहीत असे नाही, परंतु ते फारच किरकोळ आहेत, असे कुंभार म्हणाले आहेत.
कुंभार यांनी आपल्या पोस्टमध्ये 20.47 लाख कशासाठी खर्च केले जाणार आहेत, याबाबतची सविस्तर माहिती असलेली निविदेतील माहितीही शेअर केली आहे. त्यानुसार 8 बेडसाठी 12 लाख 86 हजार 88, सहा सोफ्यासाठी 6 लाख 32 हजार रुपये खर्च प्रस्तावित आहे. तर प्रत्येकी 2 हजार 627 रुपयांच्या 15 पीव्हीसी खुर्च्या खरेदी केल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे 6 कॉर्नर टेबलसाठी 90 हजार रुपये खर्च केले जाणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.