Abu Azmi Rais Shaikh Clash: महाराष्ट्रात समाजवादी पक्षात फुट? अबू आझमी-रईस शेख यांच्यात वाढली दरी
Samajwadi Party Internal Conflict: महाराष्ट्रातील समाजवादी पक्षात सध्या अंतर्गत मतभेदांचे ढग दाटल्याची चर्चा आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्रातील प्रमुख चेहरा आमदार अबू असीम आझमी आणि पक्षातील आक्रमक शैलीसाठी ओळखले जाणारे आमदार रईस शेख यांच्यातील संबंध ताणले गेल्याचे सूत्रांची माहिती आहे. या घडामोडींमुळे समाजवादी पक्ष महाराष्ट्रात फुटीच्या उंबरठ्यावर आहे का? यावर जोर धरला आहे. अबू आझमी यांनी, रईस शेख नाराज असून नाराजी दूर करू, असे सांगितले आहे.
अबू आझमी (Abu Azmi) यांच्या वाढदिवस कार्यक्रमात नाराजी झाकून राहिली नाही. पक्षामधील नाराजीचा तणाव कुठेतरी दिसत होता. मदनपुरा इथल्या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनासोबतच अबू आझमी यांच्या वाढदिवसाचं आयोजन करण्यात आले होते; मात्र या कार्यक्रमाला रईस शेख गैरहजर राहिले.
त्या वेळी ते दुबईला असल्याचे सांगण्यात आले; पण कार्यक्रमाच्या काही दिवस आधीच रईस शेख यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन ‘या कार्यक्रमाला उपस्थित राहू नका’ असा सूचक संदेश दिल्याची चर्चा आहे.
तणावाचे एक कारण म्हणजे वार्ड क्रमांक 211 म्हणजेच नागपाडा परिसर! 2017 मध्ये या वॉर्डमधून रईस शेख यांनी निवडणूक (Election) जिंकली होती. त्यामुळे हा परिसर आपल्याच प्रभावक्षेत्रात राहावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. या ठिकाणी तिकीटवाटप त्यांच्या संमतीशिवाय होऊ नये, असा त्यांचा आग्रह आहे. मात्र आझमी यांचे मत वेगळे असल्याचे दिसते.
तिकीटवाटप हा पक्ष समितीचा अधिकार असून त्यात कोणीही वैयक्तिक हस्तक्षेप करू नये, याच भूमिकेवरून दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याचे समजते. राजकीय वर्तुळात आणखी एक चर्चेचा मुद्दा म्हणजे रईस शेख यांची काँग्रेस आमदार अमीन पटेल आणि अस्लम शेख यांच्याशी वाढती जवळीक!
अधिवेशनात रईस शेख उपस्थित करत असलेल्या मुद्द्यांना हे दोन्ही आमदार जोरदार पाठिंबा देतात. त्याशिवाय रईस शेख अनेकदा त्यांच्या सहवासात दिसतात. ज्यामुळे नव्या राजकीय समीकरणांची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आली आहे. यावर बोलताना अबू आझमी यांनी सांगितले, की अमीन पटेल आणि अस्लम शेख यांना काँग्रेस पक्षातच डावलले जात आहे, उलट त्यांनीच आमच्या पक्षात यावे.
अबू आझमी यांनी सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "रईस शेख हे पक्षाचे अभ्यासू आमदार आहेत. मात्र ते आतापर्यंत जिथून जिंकून आले आहेत, तेथील सर्व उमेदवार ठरवण्याचा अधिकार त्यांना हवा आहे. कुठल्याही पक्षात असे चालत नाही. पक्षातील निवड समिती आणि अध्यक्ष उमेदवार ठरवतात. त्यामुळे ते काहीसे नाराज आहेत. त्यांची नाराजी आम्ही त्यांच्याशी चर्चा करून दूर करू".
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.