Mumbai News : एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेचा विधानसभा निवडणुकीनंतर आत्मविश्वास बावन्नपटीनं वाढल्याचं दिसून येत आहे. या वाढलेल्या विश्वासाच्या जोरावर त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी चांगलाच जोर लावला आहे. तसेच त्यांच्याकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह विरोधी पक्षांतील दिग्गज नेत्यांना गळाला लावण्यासाठी मोठी फिल्डिंग लावली जात आहे. पण आता एकनाथ शिंदेंनाच (Eknath Shinde) धक्का देत एका महिला नेत्यानं चार महिन्यांतच 'मातोश्री'ची वाट धरली आहे.
मुंबई महापालिका जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्याचवेळी दोन्ही ठाकरें बंधूंच्या एकत्र येण्याचा अभिनव प्रयोगही महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र,या सगळ्या राजकीय घडामोडी वाढल्या असतानाच दुसरीकडे धक्क्यावर धक्के बसलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आता मोठा दिलासा मिळाला आहे.
उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray Shivsena) शिवसेनेला जय महाराष्ट्र करत मोठा गाजावाजा करत एकनाथ शिंदेंच्या सोबत गेलेल्या सुजाता शिंगाडे यांची पुन्हा एकदा घरवापसी केली आहे. याचवेळी शिंगाडे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. यावेळी त्यांनी शिंदे गटात जाणं ही माझी मोठी चूक होती अशी मोठी कबुलीही दिली.
शिंगाडे म्हणाल्या, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत असताना आपल्याला चार महिने झोप लागली नाही. शिंदेंकडे फक्त देखावा आहे.खरी शिवसेना मातोश्रीतच आहे. मला कोणतंही अमिष नाही. म्हणून आपण त्यांची मिंधी नाही, असं ठणकावतानाच जी जबाबदारी द्याल ती पार पाडेन,असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.
शिंदेंच्या शिवसेनेत केवळ दिखावा सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.तसेच आपण तिथे चार-पाच महिने होतो. पण आजपर्यंत मातोश्रीनं मला अनेक महत्त्वाची पदं दिली असून 35 वर्ष संघटनेचंही काम केलं आहे. पण शिंदेंच्या पक्षात लोकं कोणत्या अमिषाला बळी पडून जाताहेत हे सांगता येत नाही. कधी उद्धव ठाकरे आणि रश्मी वहिनींना भेटू असं झाल्याची भावनाही सुजाता शिंगाडेंनी बोलून दाखवली.
शिंगाडे म्हणाल्या,माझ्या विभागात हेवेदावे असल्यानं आपण एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. पण त्या निर्णयाबद्दल दिलगिरी व्यक्त करत असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं. तसेच उद्धव ठाकरेंसारखा माणूस नाही. नगरसेवक निघून जात असतानाही ते ठाम आहे. धनुष्यबाण मिळो अथवा ना मिळो, आपण शिवसेना मोठी करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
सुजाता शिंगाडे यांनी आपल्याला कुठल्याही पदात इंटरेस्ट नसल्याचंही स्पष्ट केलं. पण उद्धव ठाकरेंची साथ सोडून लोकांनी एकनाथ शिंदेंच्या पक्षात जाऊ नये असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. आणि जे गेलेच आहेत, त्यांनी परत यावं. हे आपलं घर असल्याचे उद्गारही त्यांनी काढले.
शिंगाडे यांनी यावेळी ज्या लोकांना एकनाथ शिंदेंनी पैसे देऊन पक्षात घेतलं. त्यांनाही पश्चात्ताप होत असल्याचा दावाही त्यांनी केला. याचवेळी आपल्याला शिंदेंच्या पक्षानं काही बैठका घ्यायला लावल्या होत्या. त्याप्रमाणे आपण बैठका घेतल्या.
मात्र, तिथे कुणाचाच कुणाला ताळमेळ नसून अंदाधुंदी कारभार सुरू असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. शिंदे कुणाकडे बघतही आपल्याला मधल्या एजंटनं फसवलं होतं. पण आता आपण पुन्हा माहेरी आणि माझ्या घरी आल्याची भावनाही व्यक्त केली आहे. वहिनी माझ्यासोबत बोलल्या. आता बरं वाटत असून रश्मीवहिनी या माँसाहेबांची जागा चालवत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.