मुंबई : राष्ट्रीय शेअर बाजारातील (NSE) अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस (Police) आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांच्यासह त्यांच्या आई संतोष पांडे व मुलगा अरमान पांडे यांच्यावर सीबीआयने (Cbi) गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सक्तवसुली संचालनालयानेही (ED) गुरूवारी पांडे यांच्यावर मनी लाँर्डिंगचा गुन्हा दाखल केला होता. आज ते ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. त्यानंतर ईडीने त्यांना आज अटक केली. त्यामुळे पांडे यांना मोठा धक्का बसला आहे.
ईडीने पाच जुलै रोजी पांडे यांची एका प्रकरणात चौकशी केली होती. आता ईडीने सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने शुक्रवारी पांडे यांच्या घरी तसेच एनएसईच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामकृष्ण आणि रवी नरेन यांच्यासह अन्य काही जणांच्या घरांवर छापेमारी केली होती. देशात मुंबई, पुण्यासह जवळपास 18 ठिकाणी ही कारवाई झाली होती. यामध्ये अनेक महत्वाची कागदपत्रे, लॅपटॉप व इतर साहित्य ताब्यात घेण्यात आले होते.
त्यानंतर आता ईडीने मनी लाँर्डिंग प्रकरणात पांडे यांना अटक केली आहे. रामकृष्ण यांना ईडीने अटक केली आहे. पांडे हे 30 जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानंतर पंधरा दिवसांतच सीबीआय आणि ईडीने त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते.
काय आहे प्रकरण?
सध्या सीबीआयच्या कोठडीत असलेल्या चित्रा रामकृष्ण यांच्यासह एनएसईमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. एनएसईमधील अनियमिततेबाबत 2015 मध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याची चौकशी सुरू झाल्यानंतर सीबीआयने 2018 मध्ये पहिला गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात मार्च महिन्यात रामकृष्ण यांच्यासह अन्य काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक केली. त्यांच्या चौकशीमध्ये संजय पांडे यांच्या कंपनीचे नाव पुढे आले. सीबीआयने त्याची चौकशी सुरू केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले.
संजय पांडे यांनी 2001 मध्ये पोलीस खात्यातील सेवेचा राजीनामा दिला आणि आयसेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपनी सुरू केली. मात्र, त्यावेळी तांत्रिक कारणामुळे त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही. त्यांना पुन्हा सेवेत हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यांनी 2006 मध्ये कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पांडेंनी त्यांच्या आई व मुलाला आपल्या कंपनीत संचालकपद दिले.
एनएसई गैरव्यवहार प्रकरणात २०१८ मध्ये नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या आधारे ईडी तपास करत आहे. संजय पांडे यांनी पांडे यांनी समाविष्ट केलेली फर्म 2010 ते 2015 या कालावधीत एनएसईमध्ये सिक्युरिटी ऑडिट करण्याचे काम सोपवलेल्या आयटी कंपन्यांपैकी एक होती, यालाच को-लोकेशन घोटाळा झाल्याचे मानले जाते. या कंपनीला त्यापोटी सुमारे चार कोटी 45 लाख रुपये देण्यात आले. कंपनीने बेकायदेशीपणे फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. त्यासाठी कोणतीही अधिकृत परवनागी घेतली नाही, कर्मचाऱ्यांना विश्वासात घेतले नाही, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. फोन टॅपिंगमधील संवाद रामकृष्ण किंवा इतर अधिकाऱ्यांना पुरवले जात असल्याचा संशय सीबीआयला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.