
Mumbai, 04 February : शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपमधील यांच्यातील अंतर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मुख्यमंत्रिपदासाठी धरलेला आग्रह आणि गृहमंत्रिपदासाठी केलेला अट्टाहास यामुळे भारतीय जनता पक्षाचे नेते शिंदेंवर दुखावल्याचे मानले जात आहे. त्यातूनच भाजप आणि शिंदे यांच्यातील मनभेदाची तीव्रताही वाढू लागली आहे, त्यातूनच शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातच त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचे स्पष्ट हेात आहे. कारण शिंदेंच्या ठाण्यात भाजपने रवींद्र चव्हाण यांच्या रुपाने प्रदेश कार्यकारी अध्यक्ष नेमला आहे, त्यानंतर गणेश नाईकांसारखा तगडा आणि खमका नेता संपर्कमंत्री म्हणून उतरवला आहे, त्यामुळे भाजप आणि शिंदे यांच्यातील शीतयुद्ध दिवसेंदिवस वाढू शकते.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना भाजपने मुख्यमंत्रिपदाबरोबरच गृहमंत्रीपदही नाकारले आहे. तसेच रायगडच्या पालकमंत्रिपदाची मागणी असताना त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे शिवसेनेकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. वाद वाढल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाओसमधून स्थगिती दिली खरी पण भारतात परतून आठवडा उलटला तरी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. पण शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मनासारखी एकही गोष्ट घडताना दिसत नाही.
दरम्यान, आजपर्यंतच्या राजकीय वाटचालीत एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात एकहाती कारभार पाहिला. अगदी उद्धव ठाकरेंनीही ठाण्यात कधी लक्ष घातले नाही. मात्र, नवी मुंबईतील बडे प्रस्थ राज्याचे वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी आता ठाण्यात लक्ष घालण्याचे ठरविल्याचे दिसून येत आहे. कारण त्यांनी ठाण्यात लवकरच जनता दरबार घेणार असल्याचे सांगितले आहे. त्या माध्यमातून गणेश नाईक यांना पाठबळ देण्याचे काम भाजपकडून केले जात आहे.
याशिवाय, गणेश नाईक यांच्याकडे ठाण्याच्या संपर्कमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी मित्रपक्षाचा पालकमंत्री आहे, त्या ठिकाणी भाजपचा संपर्कमंत्री नेमण्यात आला आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांना बालेकिल्ल्यात घेरण्याची तयारी भाजपकडून चालवली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून गणेश नाईक यांना ठाण्यात लक्ष घालण्याची जबाबदारी देताना भाजपकडून बळ देण्यात येत आहे.
संपर्कमंत्री नेमणुकीबाबत महसूलमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ज्या ठिकाणी मित्रपक्षांचे पालकमंत्री आहेत, त्यात ठिकाणी भाजपने संपर्कमंत्री नेमले आहे. 17 जिल्ह्यांत संपर्कमंत्र्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आलेली आहे.
संपर्कमंत्री नेमण्याची मुभा ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. एकनाथ शिंदे आणि अजितदादांनी संपर्कमंत्री नेमले तरी आमचे काही म्हणणे नाही. आमचे 19 ठिकाणी पालकमंत्री आहेत. या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.