Mumbai BJP Politics : भाजप आमदार गणपत गायकवाड ठरलेल्या कार्यक्रमानुसार रस्त्याचे भूमिपूजन करण्यास गेले होते. मात्र हा रस्ता चर्चचा आहे, पालिकेकडून आम्हाला कोणतीही सूचना आली नाही. आम्ही जागा देतो, मात्र आम्हाला वाढीव एफएसआय हवा आहे, अशी मागणी नागरिकांनी केली. ही मागणी उद्घाटनास गेलेल्या आमदार आणि कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली. त्यांनी नागरिकांना थेट हाणामारी करण्यास सुरुवात केली. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या अशा प्रकारामुळे आमदार गायकवाडांवर टीका केली जात आहे.
दरम्यान, बुधवारी काही महिलांनी गायकवाडांवर जमीनी विकल्याचा आरोप केला होता. त्यावेळी महिलांना मारहाण करण्यात आली. यानंतर गुरुवारी पालिकेच्या सूचना नसतानाही शाळा परिसरात गायकवाडांनी भूमिपूजनाचा प्रयत्न केला. नागरिकांच्या या आरोपाचे खंडन करताना आमदार गायकवाडांनी ही जागा रस्त्याची असून चर्चच्या लोकांना हडप करायची असल्याचे सांगितले. मात्र सलग दुसऱ्या दिवशीही स्थानिक नागरिकांनीही आमदारांना चांगलेच फैलावर घेतले. या प्रकारांमुळे आमदारांचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक, पालकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमकं काय झालं ?
कल्याण पूर्वेत नूतन ज्ञान मंदिर शाळेसमोर जरीमरी परिसर आहे. या परिसरात असलेल्या एका रस्त्याचा भूमीपूजन कार्यक्रम सकाळी आयोजित करण्यात आला होता. आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्या हस्ते भूमीपूजन होणार होणार होते. ते भूमीपूजनाच्या ठिकाणी पोहचले. त्याठिकाणी सेंट ज्यूड्स शाळेचे पालक, विद्यार्थी, स्थानिक नागरिक जमा झाले. सेंट ज्यूड्स शाळेचे पालक व काही नागरिकांनी आमदार गायकवाडांना घेराव घालत काही प्रश्न उपस्थित केले. यामुळे उडालेल्या गोंधळाचे रुपांतर जोरदार राड्यात झाले.
ही जागा चर्चची
रस्त्याच्या भूमीपूजनास विरोध करणाऱ्या लोकांनी संबंधित जागा चर्चची असल्याचा दावा केला. तसेच तो रस्ताही चर्चचा असल्याचे सांगितले. दादागिरी करुन आमच्या जागेवर काम केले जात आहे. आम्हाला या संदर्भात कोणतीही सूचना महापालिकेने दिली नाही. आमच्या लोकांना मारहाण झाली आहे. आमदारांच्या कार्यकर्त्यांनी महिला लहान मुलांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
रस्त्याचे काम सुरू होणारच...
या राड्यानंतर आमदार गायकवाडांनी, हा आरक्षित भूखंड असल्याचा दावा केला. चर्चचे लोक ही जागा हडप करायचा प्रयत्न करत आहेत. सरकारने रस्त्यासाठी निधी दिला आहे. कोणी रस्ता बंद करु शकत नाही. आम्ही भूमीपूजन केले आहे. रस्त्याचे काम सुरु होणारच, असेही गायकवाडांनी ठणकावून सांगितले.
राड्याचे व्हिडिओ व्हायरल...
कल्याण (Kalyan) पूर्वेतील काही महिलांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावर काही आरोप केले आहेत. ही जागा गुजराती विकासकाला विकलेली आहे. आमदारांनी आम्हाला एक रुपयाही दिलेला नाही. त्यांनी आमची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप एका व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे. त्या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, गणपत गायकवाडांनी या महिला खोटे बोलत आहेत असे सांगून महिलांनी केलेल्या आरोपाचे खंडन केले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.