Mumbai Latest News : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. जरांगेंवर आणि मराठा आरक्षणावर टीका करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची गुरुवारी सकाळी तोडफोड करण्यात आली आहे. "आम्ही शांततेत आंदोलन करीत आहोत," असे म्हणणाऱ्या जरांगेंवर सदावर्तेंनी हल्लाबोल केला आहे. "जरांगे, हीच का शांतताप्रिय आंदोलनाची व्याख्या? " असा सवाल करीत जरांगेंना अटक करा, अशी मागणी सदावर्तेंनी केली आहे.
गाड्यांची तोडफोड झाल्यानंतर सदावर्तेंनी जरांगेंवर निशाणा साधला आहे. "राज्य सरकारने फक्त जरांगेंचे ऐकून न घेता, आमचेही ऐकावं, असे सदावर्ते म्हणाले. "पोलिसांच्या समोरच गाड्यांची तोडफोड करण्यात आली. हल्लेखोर माझ्या घरात घुसण्याचा प्रयत्न करीत होते," असा आरोप सदावर्तेंनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
"माझ्या कुटुंबीयांना वारंवार धमक्या दिल्या जात आहेत. मला कुणीच शांत करू शकत नाही. आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. माझ्या मुलीला आणि पत्नीला धमक्या दिल्या जात आहेत," असे सदावर्ते म्हणाले.
मराठा आरक्षणाला सुरुवातीपासून सदावर्ते यांनी विरोध केला आहे. आरक्षणावर त्यांनी अनेक वेळा टीका केली होती. मराठा आरक्षणाला सरकारने मंजुरी दिली होती. त्यावेळी सुप्रिम कोर्टात सदावर्तेंनी याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेमुळे हे आरक्षण रद्द झाले होते. तेव्हापासून मराठा समाजामध्ये सदावर्तेंबाबत तीव्र संताप आहे.
मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरात आज (गुरुवार) पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे समजते. या प्रकरणी तीन जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर सदावर्तेंनी टीका केली होती. त्यावरून ही तोडफोड केल्याची चर्चा आहे. सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड करणाऱ्या व्यक्ती 'एक मराठा लाख मराठा,' अशा घोषणा देत होत्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.