मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs case) प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानसह (Aryan Khan) मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंट या तिघांना उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. आर्यनला 3 ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती. न्यायालयाकडून जामिनाचा आदेश मिळाल्यानंतर आर्यनची आज किंवा उद्या कारागृहातून सुटका होणार आहे.
आर्यन खानच्या वतीने माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन सांबरे यांनी आर्यन, मुनमुन आणि अरबाझ या तिघांना जामीन मंजूर केला. उच्च न्यायालयाचा जामिनाचा आदेश मिळाल्यानंतर आर्यन याची कारागृहातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. जामिनाचा आदेश आज वेळेत कारागृहाला मिळाल्यास त्यांची आजच सुटका होईल. मात्र, याला विलंब झाल्यास त्यांची उद्या सुटका होऊ शकते.
अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने (NCB) आर्यनला 3 ऑक्टोबरला पकडले होते. तो 8 ऑक्टोबरपासून आर्थर रोड कारागृहात आहे. आर्यनच्या जामिनावर आज सुनावणी झाली. आर्यनच्या वतीने माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. रोहतगी हे आर्यनची बाजू मांडणार असल्याचे सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
मागील आठवड्यात सत्र न्यायालयात आर्यन खानच्या वतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई व सतीश मानेशिंदे यांन बाजू मांडली होती. एनसीबीकडून अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिलसिंह यानी बाजू मांडली होती. एनसीबीने आर्यनच्या व्हॉट्स अॅप चॅटची माहिती न्यायालयात सादर केली होती. तसेच काही जुन्या डॅग्ज प्रकरणांचा संदर्भही न्यायालयाला दिला होता. त्याचआधारे न्यायालयाने आर्यनचा जामीन फेटाळला होता. त्याच्यासोबत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचा जामीनही फेटाळण्यात आला होता. त्यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
सत्र न्यायालयाने आर्यनचा जामीन फेटाळण्यामागे व्हॉट्स अॅप चॅट आणि त्याच्यासोबतच्या इतर जणांकडे डॅग्ज सापडणे हे आर्यनला भोवल्याचे समोर आले होते. बॉलिवूड अभिनेता शाहरुखचा 23 वर्षीय मुलगा आर्यन खान याला एनसीबीने 3 ऑक्टोबरला अटक केली होती. आर्यन खानसोबत एनसीबीने आणखी सात जणांनाही अटक केली होती. या प्रकरणात परदेशी नागरिक आणि कथित अमली पदार्थ तस्करांसह एकूण वीस जणांना अटक करण्यात आली आहे.
आर्यन खानसह अटक केलेल्या इतर सात जणांमध्ये मुनमुन धामेचा, अरबाज मर्चंट, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, गोमित चोप्रा, नुपूर सतिजा आणि विक्रांत छोकर यांचा समावेश आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी छाप्यादरम्यान 13 ग्रॅम कोकेन, 5 ग्रॅम एमडी, 21 ग्रॅम चरस, एमडीएमए (एक्स्टसी) च्या 22 गोळ्या आणि 1.33 लाख रुपये जप्त केले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.