Karnataka Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 224 जागांपैकी जवळपास 135 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजपला फक्त 65 जागांवर विजय मिळाला. जेडीएसला केवळ 19 जागा मिळाल्या आहेत. तर अपक्षाला काही जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसनं कर्नाटकात जोरदार मुसंडी मारत एकहाती सत्ता मिळवली आहे. कर्नाटकच्या निवडणुकीत भाजपला मात्र, सत्ता राखण्यास यश आलं नाही.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. "कर्नाटक निवडणुकीच्या माध्यमातून देशातील एकाधिकारशाही आणि हुकूमशाहीच्या पराभवाला सुरुवात झाली आहे", असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला.
ठाकरे म्हणाले, "देशातील एकाधिकारशाही व हुकूमशाहीच्या पराभवाला कर्नाटकमधील निवडणुकीच्या विजयाने सुरवात झाली आहे. सर्वसामान्य माणूस हाच हुकूमशहाचा पराभव करू शकतो. हा विश्वास कर्नाटकच्या जनतेने देशाला दिला. कर्नाटकच्या जनतेने शहाणपणाने दिलेल्या निकालाबद्दल त्यांचे अभिनंदन", अशा शब्दांत ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
"कर्नाटक निवडणुकीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दाखवली. काँग्रेसचा विजय झाला. पंतप्रधान मोदी आणि शाहंच्या बळजबरी सत्तेचे जोखड कर्नाटकच्या जनतेने निर्भयपणे फेकून दिले. काँग्रेसने लोकांच्या प्रश्नांवर निवडणूक लढवली आणि जिंकली. आता 2024 च्या विजयाची ही नांदी आहे ", असं म्हणत त्यांनी प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांचेही अभिनंदन केले.
(Edited By : Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.