

Mumbai, 26 July : दिल्लीतील आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी (ता. २५ जुलै) आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज (ता. २६ जुलै) मुंबईत उद्धव आणि राज ठाकरेंच्या उपस्थितीत विजयी रॅली काढण्यात आली. त्यात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यातील अनेकांनी सरकारच्या आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या.
काँग्रेस सरकारच्या काळात १५ वर्षांपूर्वीही पेपरफुटीच्या घटना घडत होत्या, असा सवाल भाजप आणि त्यांच्या समर्थकांकडून विचारला जात आहे. पण, तो सवाल आम्हाला का विचारता, तेव्हा (काँग्रेसच्या काळात) आम्ही डायपरमध्ये होतो. आम्ही झेन झी आहोत. तो प्रश्न तुम्ही मिलेनर्सला किंवा त्यांच्या आई वडिलांना जाऊन विचारा, अशी भावना एका युवतीने बोलून दाखवली.
ती म्हणाली की, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जो राजीनामा दिला आहे, त्या राजीनामापत्रात त्यांनी असं म्हटलं आहे की, मी मंत्रिपदाचा त्याग करतोय. पण, तुम्ही तो त्याग केलेला नाही. तुम्ही सरळ सरळ चूक मान्य करा. कसला त्याग केलाय तुम्ही? २१ मुलांनी आत्महत्या केली आहे, तो त्याग केलाय तुम्ही? की दिल्ली पोलिसांनी मुलींना मारहाण केली, त्रास दिला आहे, तो त्याग केला. कोणता त्याग केलाय तुम्ही?
तुम्ही जो राजीनामा दिला आहे ना? तो तुम्ही दिला नाही, तर आम्ही तुमच्या छाताडावर बसून घेतला आहे, त्यामुळे तुम्ही त्याग केला आहे, हा शब्द तुमच्या राजीनामापत्रातून काढून टाका, अशी मागणीही या युवतीने केली.
एक युवक मोदी सरकारला टाँट मारलेला फलक हातात घेऊन रॅलीत सहभागी झाला होता. आम्ही मुंबईत रॅली काढली होती. त्यावेळी मरीन ड्राईव्हवर पोलिसांनी आम्हाला अडवून आंदोलन करण्याचा तुमच्याकडे परवाना आहे का, असे विचारले होते.
अंबानीच्या घराजवळ आम्हाला अटक करण्यात आली होती. त्यामुळे आजच्या विजयी रॅलीत मी हे लिहून आणले आहे की, ‘फायनली हम जीत गये, मैंने पोलिस स्टेशन देख लिया, थॅंक्यू मोदी अंकल’, असा फलक घेऊन पनवेलचा ओमकर रॅलीत सहभागी झाला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.