संतोष घरत
Palgar News : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील आदित्य इंडस्ट्रीज (प्लॉट क्र. डब्ल्यू-५४ (डी)) या कारखान्यातून अनधिकृत पाइपलाइनद्वारे रासायनिकयुक्त सांडपाणी सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या (सीईटीपी) चेंबरमध्ये सोडले जात असल्याचा प्रकार प्रत्यक्ष निदर्शनास आला आहे.
बंद असलेल्या स्काडा प्रणालीच्या जोडणीला पाइप जोडून त्यावर मातीचा भराव करण्यात आल्याचे दिसून आल्याने औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी व्यवस्थापन आणि देखरेख यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
संबंधित कारखाना शून्य द्रव विसर्ग (झेडएलडी) प्रणालीअंतर्गत येत असल्याने या प्रकाराचे गांभीर्य वाढले आहे. झेडएलडी प्रणालीमध्ये औद्योगिक सांडपाण्याचा पुनर्वापर करून बाह्य विसर्ग टाळणे अपेक्षित असते. अशा परिस्थितीत अनधिकृत पाइपलाइनद्वारे सांडपाणी सीईटीपीच्या चेंबरमध्ये सोडले जात असल्याचे निदर्शनास आल्याने या विसर्गाचे स्वरूप आणि त्यामागील वस्तुस्थिती तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.
तारापूर सीईटीपीच्या स्काडा प्रणालीच्या देखरेखीची जबाबदारी ई अँड वाय या संस्थेकडे असल्याची माहिती आहे. स्काडा प्रणालीच्या माध्यमातून सांडपाण्याच्या प्रवाहावर देखरेख ठेवली जात असताना संबंधित प्रकार लक्षात आला होता का, तसेच बंद जोडणीला पाइप जोडण्यात आल्याची नोंद प्रणालीत झाली होती का, याची तपासणी आवश्यक आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि सीईटीपी प्रशासनाने संयुक्त तपासणी करून संबंधित पाइपलाइनची जोडणी, सांडपाण्याचे स्वरूप आणि विसर्गाची वस्तुस्थिती स्पष्ट करावी. तसेच स्काडा देखरेखीतील संभाव्य त्रुटींची चौकशी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
कंपनीचे मालक निकुंजन साहू यांनी सांगितले की, सीईटीच्या पाइपलाइनचे काम मीच करतो. एचडीपीई पाइपलाइन तुटल्यानंतर दुरुस्तीचे कामही मीच करतो. मात्र, संबंधित पाइपलाइन नेमकी कोणी टाकली आहे, हे मी सांगू शकत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.