
Mumbai, 24 December : मंत्रालयाच्या पायऱ्या चढताना मला जुने दिवस आठवले. शाळेत असताना मी किर्तीकर मार्केटमधून अगरबत्त्या आणि जयंत साळगांवकर यांच्याकडून कॅलेंडर विकत घेऊन विविध सरकारी कार्यालये, स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि मंत्रालयात विकायचे काम केले आहे. तो सर्व प्रवास माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला, अशी आठवण राज्याचे परिवहन मंत्री (Transport Minister) प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर सांगितली.
प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी आज परिवहन खात्याचा पद्भार स्वीकारला. त्यानंतर माध्यमाशी बोलताना सरनाईक यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, मुंबईतील भवानी शंकर रोडवरील महापालिकेच्या शाळेत मी शिक्षण घेत होतो. आचार्य अत्रे यांचा ‘मराठा’ त्या वेळी बंद पडला होता. त्या ठिकाणी वडिल कामाला होते. घरी कमावणारं कोणी नव्हतं. त्यामुळे मी किर्तीकर मार्केटमधून होलसेल अगरबत्या घ्यायचो आणि त्या घरोघरी जाऊन विकायचो. काही लोकांनी कार्यालयात जाऊन अगरबत्या विकण्याबाबत सूचविले आणि मी विविध सरकारी कार्यालये, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, असं करता करता मंत्रालयात यायला लागलो.
जयंत साळगावकर हे माझ्या वडिलांचे मित्र होते, त्यांनी नुकतंच कालनिर्णय हे कॅलेंडर काढायला सुरुवात केली होती, त्यामुळे साळगांवकर हे शंभर कॅलेंडर मला उधारीवर द्यायचे. एक कॅलेंडर एक रुपये ३० पैशांना मिळायचे, ते मी एक रुपया ६० पैशांना विकायचो. त्यावेळी मला एक कॅलेंडमागे ३० पैसे मिळायचे. दिवसभरात मी ३० रुपये निश्चितपणे कमवायचो, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.
प्रताप सरनाईक म्हणाले, पुढे वडिलांनी डोंबिवलीत घर घेतले. त्या ठिकाणी मी मी रिक्षा वाहतूक सुरू केली. आता माझ्याकडे महागड्या गाड्या असल्या तरी एसटी महामंडळाच्या आगाराला एसटी बसने प्रवास करूनच भेट देईन. लोकांच्या अडचणी काय आहेत, त्यांना सुविधा काय पाहिजेत, हे मला या प्रवासातून समजेल. लोकांना माफक सुविधांची अपेक्षा असते. बस वेळवर असाव्यात, बस स्थानकात स्वच्छ पाणी प्यायला मिळावे, यासाठी माझे प्राधान्य राहणार आहे.
सरनाईक म्हणाले, एसटी महामंडळातील बदल्याचे रॅकेट मी मोडून काढणार आहे. महामंडळातील सर्व बदल्या ऑनलाईन झाल्या पाहिजेत. एसटी कर्मचाऱ्यांना सुविधा देताना त्यांच्याच माध्यमातून प्रवाशांना सुविधा कशा देता येतील, याकडे माझे लक्ष असणार आहे.
तसेच, मुंबईतील रस्त्यांवर ‘रोप वे टॅक्सी’ सुरू करण्याबाबत माझा विचार आहे. यासंदर्भात माझं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलणं झालं आहे. राज्य सरकारने याबाबतचा प्रस्ताव माझ्याकडे पाठविला, तर मी त्याला मान्यता देईन, असा शब्दही त्यांनी मला दिला आहे, असेही प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.
ठाण्याचे पालकमंत्रिपद शिंदेंनी स्वीकारावे
मी गेली 30 वर्षांपासून एकनाथ शिंदे यांचा सहकारी आहे. आम्ही दोघांनी 1997 पासून नगरसेवक म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. मुख्यमंत्री असताना त्यांनी जेवढा निधी दिला आहे, तेवढा निधी कोणत्याही मंत्र्याने दिलेला नाही. तसेच, ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे एकनाथ शिंदेंनीच ठाण्याचे पालकमंत्रिपद स्वीकारावे, अशी मी त्यांना विनंती करणार आहे, असेही प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.