

Devendra Fadnavis on Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच विधानसभेत निवेदन दिलं. यामध्ये त्यांनी हे प्रकरणं नेमकं कसं उघड झालं? एसआयटी नेमकी कधी स्थापन झाली आणि खरातला कधी आणि कशी अटक झाली याची सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर खरातच्या अटकेनंतर त्याच्याविरोधात तीन महिलांनी तक्रारी दिल्या, या तक्रारींमध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलं? म्हणजेच खरातनं नेमके काय उद्योग केले हे देखील मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सविस्तर सांगितलं.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, २९ डिसेंबर २०२५ रोजी अशोककुमार एकनाथ खरात या नावानं नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. या तक्रारीत म्हटलं की, आरोपी दिनेश मनाजी परब यानं त्याच्या मोबाईलवरुन व्हॉट्सअॅपद्वारे अशोक खरात आणि एका महिलेचे चार फोटो शेअर करुन पुन्हा डिलीट केले. त्यानंतर हे फोटो समाजात व्हायरल करण्याची धमकी देऊन ते जर व्हायरल करायचे नसतील तर ५ कोटी रुपये देण्याची व्हॉट्सअॅप कॉलवरुन धमकीही दिली. हे फोटो दिनेश परब याला राजेंद्र जासूद यानं दिले आहेत, असं या तक्रारीत म्हटलं होतं. याबाबत वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा प्राथमिक तपास नाशिक ग्रामीणच्या गुन्हे शाखेनं करुन फिर्यादी अशोककुमार खरात याचा मोबाईल तपासला पण त्यात काहीही पुरावा आढळून आला नाही. तपास सुरु असताना खरातनं परबसोबत केलेल्या मेसेजेस पोलिसांनी जप्त केले. याबाबत फिर्यादीनं अर्थात अशोक खरातनं सांगितलेल्या तक्रारीबाबतचा पुरावा आढळून आला नाही. त्यामुळं परब याला हायकोर्टातून जामीन तर जासूद याला जिल्हा कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर मिळाला. नीरज जाधव याच्या सहभागाबाबत आजपर्यंत तपासात पुरावा आढळून आला नाही. हा अशोक खरात प्रकरणातला पहिला भाग होता, खुद्द खरातनंच तक्रार केली होती, त्यातून आपल्याला ही केस लक्षात आली.
त्यानंतर १८ फेब्रुवारी २०२६ रोजी शिर्डीत एका महिलेनं तक्रार दिली की, तिला नीरज जाधव यानं व्हॉट्सअॅपद्वारे AI जनरेटेड अश्लिल फोटो शेअर करुन तो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानुसार नीरज जाधव याच्याविरोधात आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सुरु असाताना तक्रारदार महिलेनं आपला मोबाईल तपास कामात दिला नाही. तसंच कोणत्या मोबाईलवरुन मेसेज आला हे देखील सांगता आलं नाही. पण यातील आरोपी नीरज जाधवचा शोध घेत असताना अशोक खरात याच्याशी सबंधित योगेश भालेराव या साक्षीदारानं काही व्हिडिओ तपास अधिकाऱ्यांना दाखवले. यामध्ये एकूण ८ महिलांचे ३५ व्हिडिओ असल्याचं समोर आलं. या व्हिडिओतील महिलांसोबत अशोक खरात यानं भोंदूगिरी, जादूटोणा व तंत्रमंत्र वापरुन अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार अन् अश्लिल चाळे केल्याचं दिसून आलं. ज्या साक्षीदारानं हे व्हिडिओ पोलिसांना दिले, पण त्याला खरातकडून जीवे मारण्याची भीती होती, त्यामुळं तो व्हिडिओ देण्यास तयार नव्हता. त्यामुळं पोलिसांनी त्याला संरक्षण दिलं आणि त्याच्याकडून ते व्हिडिओ पुरावे मिळवले. या सर्व घडामोडींनंतर अशोक खरात हा परदेशात पळून जाण्याची शक्यता होती, त्यामुळं खरातविरोधात लुकआऊट नोटीस एअरपोर्ट अथॉरिटीला दिली गेली. त्यानंतर १० मार्च २०२६ रोजी एअरपोर्ट अथॉरिटीनं त्याला तात्काळ परदेशात जाण्यास बंदी घातली.
दरम्यान, वावी पोलीस स्टेशन आणि शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये तपासात समोर आलेले गुन्हे गंभीर होते. त्यामुळं या दोन्ही पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांच्या तपासासाठी विशेष पोलीस महासंचालकांच्या सुचनेनुसार १३ मार्च २०२६ रोजी विशेष तपास पथकाची स्थापना करुन हे गुन्हे त्यांच्याकडं वर्ग करण्यात आले. त्यानंतर १७ मार्च २०२६ रोजी रात्री सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, अशोक खरात यानं स्वतःकडं दैवीशक्ती असल्याचा खोटा दावा करुन मंत्र-तंत्र व धार्मिक विधीच्या नावाखाली फिर्यादीच्या मनात विश्वास निर्माण करुन ओकस प्रॉपर्टीज, कॅनडा कॉर्नर, नाशिक. या ऑफिसमध्ये बोलावून तिला गुंगीचं पाणी प्यायला देऊन, संमोहित करुन, आयुष्य बरबाद करण्याची तसंच तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्या इच्छेविरोधात वारंवार बलात्कार केला. याप्रकरणात खरातवर बीएनएस, महाराष्ट्र नरबळी, अनिष्ठ व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर अशोक खरातला १७ मार्च २०२६ रोजी रात्री १२ वाजताच्या दरम्यान अटक करण्यात आली. या अटकेनंतर मग पुढे माध्यमांमध्ये हे प्रकरणं पुढे आल्यानंतर त्याची खरात याची एकूण संपत्ती आणि जप्त केलेल्या वस्तूंची माहिती समोर आली, अशी अशोक खरात प्रकरणातील संपूर्ण टाईमलाईन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.