

Nashik News : भोंदू अशोक खरातचे अनेक कारनामे समोर येत आहेत. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्यानंतर व एसआयटीच्या माध्यमातून तपास सुरु झाल्यानंतर नवनवीन तक्रारी दाखल होत आहे. आतापर्यंत ६ महिलांनी त्याच्याविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दिल्याने त्याच्याविरोधात ६ फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे आता भोंदू खरातवर आता थेट खुनाचा आरोप करण्यात आला आहे. नाशिकच्या गौळाणे येथील शेतकरी विलास जाधव यांनी आपला भाऊ कैलास जाधव यांच्या संशयास्पद मृत्यूसाठी अशोक खरात यालाच जबाबदार धरत गंभीर आरोप केले आहेत. जमिनीच्या वादातून आपल्या भावाचा घातपात करण्यात आल्याचा आरोप शेतकरी जाधव यांनी केला आहे. यांसदर्भात विलास जाधव यांनी एसआयटीकडे तक्रार अर्ज दिला आहे.
या तक्रारीनंतर या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. भोंदू खरातने दमदाटी करुन व धमक्या देऊन नाशिकच्या गौळाणे शिवार परिसरात अनेक जमिनी बळकावल्याचा आरोप आहे. याच संदर्भात कैलास जाधव यांनी ५ ऑगस्ट २०२२ मध्ये नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. १२ जणांच्या विरोधात कैलास जाधव यांनी तक्रार दिली होती. त्यात अशोक खरात व त्याच्या पत्नीचेही नाव होते.
कैलास जाधव यांच्या तक्रारीनुसार, नाशिक तालुक्यातील गौळाणे येथील जमीन खरेदीसाठी संशयित आरोपींकडून सुरुवातीला साठेखत व इसार पावती करण्यात आली. सुरुवातीला चेकद्वारे व्यवहार करण्यात आला. दि. दि. १९ एप्रिल २०१२ रोजी हा व्यवहार झाला. त्यानंतर टप्प्याटप्याने चेक, आरटीजीएस, बँक व्यवहार तसेच रोख स्वरुपात एकूण सुमारे ५० ते ५४ लाख रुपये संशियत आरोपींना देण्यात आले. मात्र, पूर्ण रक्कम घेऊनही संबंधित जमीन संशयित आरोपींनी परस्पर संगनमत करून तिसऱ्याच व्यक्तीला विकल्याचा आरोप कै. कैलास जाधव यांनी त्यावेळी तक्रारीत केला होता.
सदर जमीन दि. १९ जुलै २०२२ रोजी खरेदीखत दस्त नोंदणी करून अशोक खरात व कल्पना अशोक खरात यांच्या नावे करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत विचारणा केल्यावर संशयित आरोपींकडून शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. जमिनीवर पाय ठेवला तर जीवेठार मारुन टाकू अशा धमक्या वारंवार देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्यानंतर कैलास याने न्यायालयात दावा दाखल केला. त्यावर सुनावणी होऊन स्थगिती आदेश मिळण्याची शक्यता होती. मात्र, दोन दिवस अगोदरच कैलास यांचा अपघाती मृत्यू झाला, असे बंधू विलास जाधव यांनी सोमवारी (दि. २३) माध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान त्यावेळीही आपण पोलिस ठाण्यात खरात यांच्याविरूद्ध तक्रार दिली होती असा दावा जाधव यांनी केला आहे.
कैलास जाधव यांचा अपघात नसून तो पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा आरोप विलास जाधव यांनी केला आहे. हा मृत्यू अशोक खरातने घडवून आणल्याचा आरोप विलास जाधव यांनी केला आहे. दरम्यान, या आरोपांमुळे अशोक खरातवर खुनाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांकडून या सर्व बाबींची पडताळणी करण्यात येत असल्याचे समजते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.