Mumbai : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात सत्तेत आलेल्या महायुती सरकारची मुख्यमंत्रिपदाची माळ एकनाथ शिंदेंच्या गळ्यात पडली. त्यानंतर धडाकेबाज निर्णय, अनेक महत्त्वपूर्ण घोषणा शिंदेंनी केल्या. सरकारच्या योजना तळागाळातल्या घटकांपर्यंत पोहाेचत नाहीत, अशी ओरड नेहमी ऐकायला मिळते. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंनी सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रमाची घोषणा केली.
'शासन आपल्या दारी' असे नाव देत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आत्तापर्यंत अहमदनगर, कोल्हापूर, जेजुरी, पाचोरा अशा अनेक ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा(Eknath Shinde) महत्त्वाकांक्षी उपक्रम म्हणून 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाकडे पाहिले जाते. आता हाच उपक्रम विरोधकांच्या निशाण्यावर आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी राज्य सरकारच्या 'शासन आपल्या दारी' या उपक्रमाच्या खर्चावरून महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर अजित पवार गटात गेलेले कृषिमंत्री, आमदार धनंजय मुंडेंच्या बालेकिल्ल्यात अर्थात परळी येथे 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम लवकरच होणार आहे. मात्र, विरोधकांनी याच कार्यक्रमाच्या अवाच्या सव्वा खर्चावरून राजकारण तापवलं आहे. 'शासन आपल्या दारी... खर्चदेखील सर्वसामान्यांच्या माथ्यावरी...' असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे मोजक्या शब्दांत सरकारवर जोरदार टीका केली.
पाटील म्हणाले, धनंजय मुंडे यांनी परळी येथील नियोजित कार्यक्रमाच्या मंडपासाठी जवळपास २ कोटी २१ लाख ९० हजार ८५० रुपयांची निविदा मागवण्यात आली आहे. मुख्य मंडपासाठी ८१ लाख ९४ हजार १०० रुपयांची निविदा मागविण्यात आली आहे. साईड मंडपासाठी ६० लाख १४ हजार १४० रुपयांची निविदा मागविण्यात आली आहे, तर इलेक्ट्रिक कामांसाठी ७९ लाख ८२ हजार ५१० रुपयांची निविदा मागवण्यात आली आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सडकून टीका केली आहे.
...अन् बीडचा उपक्रम परळीत हलवला गेला!
अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांच्या बीड जिल्ह्यातही हा कार्यक्रम होणार होता. मात्र, अजित पवार गटात सत्तेत सहभागी झाला आणि मुंडेंना या सरकारमध्ये कृषिमंत्रिपदाची जबाबदारी मिळाली. तसेच आता बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद हेही मुंडेंकडे येण्याची शक्यता आहे. यावरून सरकारमध्ये मुंडेंचं वजन चांगलंच वाढल्याची चर्चा आहे. कारण बीडला होणारा 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम आता परळीत होणार आहे.
'' लाभार्थींना २०० किलोमीटरचा फेरा मारावा लागणार...''
मुख्यालय आणि जिल्ह्यातील बीड वगळता अन्य १० तालुक्यांतील लाभार्थींसाठी मध्यवर्ती व सोयीचे असलेल्या बीडला हा उपक्रम घेण्याचे ठरले. परंतु, राज्यात सत्तासमीकरणे बदलली आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे मंत्री झाले. त्यामुळे आता 'शासन आपल्या दारी' उपक्रमाचे ठिकाण थेट परळी ठरले आहे. परळीचे अंतर बीडहून १०० किलोमीटर तर आष्टीहून तब्बल २०० किलोमीटरच्या घरात आहे. म्हणजे आष्टी तालुक्यातील लाभार्थींना आता २०० किलोमीटरचा फेरा मारावा लागणार आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.