Jaydeep Jaydeo Thackeray मुंबई: राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा जयदेव ठाकरे यांच्या मुलाने म्हणजेच बाळासाहेबांचे नातू जयदीप ठाकरे यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी झालेल्या दसरा मेळाव्यात जयदेव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहत एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला होता. पण आता त्यांच्याच मुलाने थेट उद्धव ठाकरेंना पाठिंबा देत असल्याचं जाहिर केलं आहे. त्यामुळे सत्ता संघर्षात नवा ट्विस्ट आला आहे.
मी आतापर्यंत दसरा मेळावा फक्त ऐकत आलो. पण यावर्षी दसरा मेळाव्याला जाऊन अनुभव घेतला. उद्धव काकांनी संधी दिली तर मी नक्की राजकारणात जाईन. बाकी कुटुंब कोणाला पाठिंबा देतंय याबाबत मला काही बोलायचं नाही. मी बाळासाहेबांचा मोठा नातू म्हणून उद्धव काकांच्या दसरा मेळाव्यात गेलो होतो. मोठा नातू म्हणून मी जबाबदारी पार पाडली, असंही जयदीप ठाकरे यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेत दोन गट पडतील असं कधी वाटलं नव्हतं. पण सर्वांना माहिती आहे की मूळ शिवसेना कोणाची आहे. कोरोना महामारी काळात काका स्वतः आजारी असताना त्यांनी खूप चांगल काम केलं. असंही जयदीप ठाकरे यांनी म्हटलं. पण वडिल शिंदे गटात आणि मुलगा शिवसेनेत असे चित्र सध्या राज्याच्या राजकारणात दिसत आहे. त्यानंतर आता जयदीप ठाकरेंची यापुढे काय भूमिका असेल, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बीकेसी मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र, सून आणि नातू उपस्थित राहिले. यामुळे माध्यमांमध्ये या गोष्टीची जोरदार चर्चा झाली. बाळासाहेबांचे पुत्र जयदेव ठाकरे, सून स्मिता ठाकरे आणि नातू निहार ठाकरे हे एकनाथ शिंदेच्या दसरा मेळाव्यात उपस्थित राहिले होते.
दरम्यान जयदीप ठाकरे यांची आई स्मिता ठाकरे आणि वडील जयदेव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला उपस्थिती लावली होती. यामुळे उद्धव ठाकरे कसे एकटे पडले हे दाखवण्याचा शिंदे गटाकडून प्रयत्न केला गेला. मात्र मी उद्धव काकांच्या दसरा मेळाव्याला बाळासाहेबांचा मोठा नातू म्हणून उपस्थित होतो, असा खुलासा जयदीप यांनी केला आहे. यामुळे ठाकरे घराण्यातील काही सदस्य जरी शिंदे यांच्या बाजूने गेले असतील तरी काही सदस्यांचा उद्धव ठाकरेंनाच पाठिंबा असल्याचा दिसते. याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या आत्येबहीण कीर्ती फाटत यांनीही उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली आहे. तर बाळासाहेबांना त्रास दिलेल्या स्मिता ठाकरे आणि जयदेव ठाकरे यांचा सत्कार करून शिंदेंनी नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न केला. असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. यावर आता शिंदे गटाकडून काय उत्तर येतं हे बघावं लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.