मुंबई : माजी न्यायमूर्ती पी. पी. सावंत यांच्या चौकशी आयोगाने ज्यांना भ्रष्टाचारी ठरवले. त्यामुळे ज्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला, घरी बसावे लागले, ते नवाब मलिक आता भ्रष्टाचारावर बोलून भ्रष्टाचाराची नवी व्याख्या करीत आहेत, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अशिष शेलार यांनी केली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मलिक यांच्यावर आरोप केल्यानंतर आज मलिक यांनी फडणवीस यांना उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. मलिक यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शेलार बोलत होते. शेलार यांनी मलिक यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शेलार म्हणाले, ‘‘ न्यायमूर्ती सावंत यांच्या अहवालानंतर ज्यांना मंत्रीमंडळातून राजीनामा देऊन घरी जावे लागले ते मलिक आता भ्रष्टाचारावर बोलत आहेत. गुन्हेगारांना आणि अर्थिक घोटाळे करणाऱ्यांना राजकीय आश्रय ही तर राष्ट्रवादी कॉंग्रेसची परंपरा आहे. मलिक त्याच परंपरेतील आहेत. ज्या इम्रान आलम शेखचा संबंध मलिक भारतीय जनता पार्टीशी लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. तो शेख आधी कॉंग्रेसचा सचिव व आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्ता असल्याची साधी माहिती मलिकांना नसावी याचे आश्चर्य वाटते.’’
आपलेच म्हणणे खरे आहे हे सांगण्यासाठी आणि जावयाच्या बचावासाठी मलिक हे सारे करीत असून त्यांची राजकारणाची नीच पातळी गाठली आहे. त्यास आता नीच नवाबी पातळी म्हणावे लागेल, अशी टीका शेलार यांनी केली आहे. समाजातील आणि राजकारणातील अल्पसंख्याक नावे वेचून त्यांना बदनाम करण्याचे आणि नेस्तनाबूत करण्याचे काम मलिक करीत आहेत. त्यासाठी रोज नवीन नावे घेत आहेत. अभिनेता शाहरूख खान तसेच कॉंग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांचे नाव मलिक घेत आहेत. आणखी एका मुस्लीम मंत्र्यांना अशा प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न मलिक यांच्याकडून सुरू असल्याचा आरोप शेलार यांनी केला.
गेल्या काही दिवसांपासून मलिकांची चिंता वाटू लागली आहे. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले की काय असे वाटू लागले आहे. बिनबुडाचे आरोप करून ते मूळ विषयातून महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांचा चेहरा बघण्यासारखा होता, असा टोला शेलार यांनी लगावला.
Edited By : Umesh Ghongade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.