Mumbai News, 10 Jan : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन दोन महिने झाले तरीही अद्याप या पराभवाची चर्चा आघाडीतील नेत्यांकडून सुरू आहे. अशातच आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे पुन्हा आघाडीतील मित्र पक्षांमध्ये धुसफूस सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.
"महाविकास आघाडीत तब्बल 20 दिवस जागावाटपाचा घोळ कायम ठेवण्यात आला, याचाच फटका मविआला विधानसभा निवडणुकीत बसला, असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या पराभवाचं कारणच सांगितलं आहे. मात्र, हे कारण सांगताना त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडे बोट केलं आहे.
तर वडेट्टीवार यांच्या याच वक्तव्यावर आता संजय राऊतांनी (Sanjay Raut) प्रत्युत्तर दिलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले, जागावाटपाची प्रक्रिया ज्या पद्धतीन लांबली गेली त्याची गरज नव्हती हे आमच्या सगळ्यांचच म्हणणं आहे. ती का, कोणामुळे आणि कशी लांबली, हे बहुतेक विजय वडेट्टीवारांना माहीत असावं. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागावाटप संपलेलं नव्हतं हे सत्य आहे.
कोणत्याही आघाडीमध्ये जागावाटप इतक्या उशीराने झालं तर एक अस्वस्थता पसरते, कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी वेळ मिळत नाही, असं राऊत म्हणाले. तर याचवेळी त्यांनी महायुतीचं (Mahayuti) जागावाटप दोन महिन्यांपूर्वीच संपलं होतं. त्यांच्या चर्चा वगैरे सुरू होत्या पण जागावाटप संपलं होतं, असा दावा केला. तर विजय वडेट्टीवारांची जी वेदना आहे तीच संपूर्ण महाविकास आघाडीची वेदना आहे.
तसंच त्यावेळी झालेल्या चुका स्वीकारल्या पाहिजेत, अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने जागावाटप झालं, आम्ही तेव्हाही सांगत होतो पण आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही, असंही राऊत यावेळी म्हणाले. दरम्यान, विधानसभेतील पराभवानंतर आता राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आघाडी एकत्रितपणे सामोरं जाणार की वेगवेगळं लढणार हे अद्याप ठरलेलं नाही.
कारण मुंबई महापालिका ठाकरेंची शिवसेना आघाडीशिवाय लढणार असल्याची चर्चा आहे. तसे संकेतही ठाकरे गटाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाच्या या भूमिकेवर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.