
Mumbai, 07 July : विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत बोलताना नाना पटोले आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चांगलीच जुगलबंदी गाजली. पटोले बोलत असताना शिंदे यांनी तुमचा लाडकी बहीण योजनेला विरोध आहे का?, असा सवाल केला. त्याला पटोलेंनी ‘कोण म्हटलं?’ असा सवाल केला. त्यावर शिंदेंनी ‘अदानी’ला विरोध आहे, अशी टिपण्णी केली. त्यावर उत्तर देताना नाना पटोले यांनी आमचा ‘ए गॅंग’ला विरोध आहे, असे विधान केले, त्यामुळे नानांच्या मनातील ‘ए गॅंग’ कोणती असा सवाल उपस्थित होत आहे.
विधानसभेत आज (ता. ०७ जुलै) पुरवणी मागण्यांवरील चर्चेत बोलताना नाना पटोले (Nana Patole) यांनी २०२५-२६ या वर्षातील पुरवण्या मागण्याला विरोध करण्यासाठी मी उभा आहे, असे सुरुवातीलाच सांगून टाकले.
ते म्हणाले, महायुती सरकारने (Mahayuti Government) एक नवीन पायंडा महाराष्ट्रात पाडला आहे. महाराष्ट्र हे प्रगत आणि आगळं वेगळं राज्य आहे. खर्चावर मर्यादा ठेवून विकास कामांवर लक्ष केंद्रीत करणारे हे राज्य आहे, अशी महाराष्ट्राची ख्याती होती. आपण ५७ हजार कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मांडल्या. मी काही अर्थशास्त्रज्ञ नाही. मुनगंटीवार अर्थशास्त्रज्ञ आहेत, कारण तुम्ही अर्थमंत्री होता म्हणून...सलग पाच वर्षे आपण पाचवेळी अर्थसंकल्प मांडलेला आहे.
राज्याचा अर्थसंकल्प मार्चमध्ये मांडण्यात आला. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत आपण ५७ हजार कोटींच्यावर पुरवण्या मागण्या मांडत आहोत. याचा अर्थ राज्याचं दिवाळं निघालं आहे. अर्थिक समतोल बिघडला आहे. आर्थिक नियोजन नाही. पैसे खर्च करण्याचे कोणतेही तारत्म्य नाही. पैसे विकासकामांवर खर्च करण्यापेक्षा काही मूठभर लोकांवर खर्च करण्याचे धोरण या महायुती सरकारचे आहे, असेही पटोले म्हणाले.
नाना पटोले बोलत असतानाच सत्ताधारी बाकावरून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेला विरोध आहे का, असा प्रश्न विचारला. त्यावर पटोले यांनी कोण म्हटलं? असा सवाल केला. तो करत असतानाच एकनाथ शिंदे यांनी ‘अदानी’ला विरोध आहे, अशी टिपण्णी करण्यात आली. त्यावर नाना पटोले यांनी आमचा ‘ए गॅंग’ला विरोध आहे.
मुंबईत पहिली ‘डी गॅंग’ होती. आता ‘ए गॅंग’ आली आहे, त्यामुळे मूठभर लोकांसाठी हे सरकार चालतंय का? अशी भावना आता राज्यातील जनतेची झालेली आहे. आता उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आपला लाडकी बहीण योजनेला विरोध आहे का. आमचा लाडकी बहीण योजनेला अजिबात विरोध नाही. आम्ही आमच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहीणाला ३१०० रुपये देऊ असं सांगितलं होतं. महायुतीने २१०० रुपये असं सांगितलं होतं. पण ते पंधराशे रुपयांवर आले आहेत.
ज्यावेळी त्यांनी लाडकी बहिणीची घोषणा केली, त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि अजित पवार अर्थमंत्री होते. पण तेच आता लाडक्या बहिणीला पंधराशे रुपयांवरून पाचशे रुपयांवर आणले आहे. योजना जाहीर करताना कोणतेही निकष लावले नाहीत. मग आताच निकष का लावता?. त्यांनी २१०० रुपये दिलेच पाहिजेत. एकनाथ शिंदे हे बसून जे बोलले आहेत, त्यावर आम्ही आमची भूमिका मांडली, असेही नाना पटोले यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.